महाराष्ट्र

Dharmaraobaba Atram : अन्यथा कंत्राटदारांना तुरुंगाची हवा खावी लागेल!

Gadchiroli : धर्मराव बाबा आत्राम भडकले; रस्त्यांवरील खड्यांवरून दिला इशारा

गडचिरोली जिल्ह्यात पावसामुळे रस्त्यांवर जागोजागी खड्डे पडल्याने नागरिकांना नाहक त्रास होत आहे. राष्ट्रीय महामार्ग, सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा परिषदेच्या रस्ते बांधकाम विभागाने तातडीने खड्डे बुजवून रस्ते दुरूस्त करावे. तसेच रस्ते बांधकामाची मंजूरी असतानाही ज्या कंत्राटदारांनी विहित मुदतीत कामे पूर्ण केली नाहीत त्यांना ब्लॅकलिस्ट करेन, असा सज्जड दम अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी अधिकारी व कंत्राटदारांना दिला.

अक्षम्य दिरंगाई करणाऱ्या अधिकारी व कंत्राटदारांना तुरूंगाची हवा खावी लागेल, असा स्पष्ट इशाराही त्यांनी यावेळी दिला. अहेरी मतदारसंघातील विकासकामांचा आढावा धर्मरावबाबा आत्राम यांनी शनिवारी (3 ऑगस्ट) जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात घेतला. जिल्हाधिकारी संजय दैने, सिनेट सदस्या तनुश्री आत्राम, अहेरीचे उपविभागीय अधिकारी आदित्य जीवने, निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल सुर्यवंशी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार, जिल्हा नियोजन अधिकारी पाचकवडे यावेळी उपस्थित होते.

जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली. पुरामुळे रस्ते व पूल क्षतीग्रस्त झाले आहेत. त्यांची तातडीने दुरूस्ती करावी. आलापल्ली, लगाम, मार्कंडा, खमनपूर, आष्टी, भामरागड, सिरोंचा, रेपणपल्ली या मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका होऊ शकतो. त्यामुळे तातडीने या मार्गांवरील खड्डे बुजविण्यात यावे. लगाम ते आलापल्ली या राष्ट्रीय महामार्गाच्या बाधकामाला वनविभागाचीही परवानगी मिळाली आहे. त्यामुळे कोणतीही कारणे न देता येथील रस्ते बांधकामाची कामांना सुरवात करावी. अपूर्ण रस्ते बांधकामांमुळे जिल्ह्याची नाहक बदनामी होत असून याबाबतीत कोणताही निष्काळजीपणे खपवून घेतला जाणार नसल्याचा इशारा आत्राम यांनी दिला.

भामरागड मार्गाचे काम तातडीने सुरू करा

आलापल्ली ते खमनचेरू, आलापल्ली ते भामरागड, आष्टी- आलापल्ली आलापल्ली-गोमनी मार्कडा या रस्त्याचे काम तातडीने सुरू करण्यात यावे असे निर्देश राज्याचे अन्न व औषध प्रशासनमंत्री ना. धर्मराव बाबा आत्राम यांनी अधिकारी तसेच कंत्राटदारांना दिला.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!