महाराष्ट्र

Reservation News : ‘ना नेता ना पक्ष; धनगर आरक्षण एकच लक्ष’

Solapur : आरक्षणासाठी धनगर समाजाचा एल्गार; राज्यभरात करणार उपोषण

राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला असतानाच आता धनगर समाजही आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणार आहे. धनगर समाजाकडून पुन्हा एकदा आंदोलनाचा एल्गार पुकारण्यात आला आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभर आमरण उपोषण करणार असल्याची माहिती आहे. सकल धनगर समाज संघटनेकडून आंदोलनाची घोषणा करण्यात आली आहे.

लोकसभा निवडणुकीदरम्यान मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच गाजला. गेल्या अनेक महिन्यांपासून राज्यात मराठा आरक्षणाचे पडसाद पाहायला मिळाले. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली वेगवेगळ्या पद्धतीने मराठा समाजाकडून आंदोलन करण्यात आले. तर दुसरीकडे ओबीसी समाजही आरक्षण वाचविण्यासाठी मैदानात उतरलेला आहे. तर वंचित बहुजन आघाडीकडून आरक्षण बचाव यात्रा सुरू आहे. एकंदरीतच राज्यात सध्या वेगवेगळ्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून वातावरण तापलं आहे. असं असतानाच आता धनगर समाजाकडून आरक्षणाचा मुद्दा पुन्हा पुढे करण्यात आला आहे. सकल धनगर समाजाकडून आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलनाचे हत्यार उपसले जाणार आहे. सकल धनगर समाजाच्या वतीने 9 सप्टेंबरपासून पंढरपूरमध्ये आमरण उपोषणाला सुरुवात होणार असल्याची माहिती पुढे आली आहे.

सकल धनगर समाज‘ना नेता ना पक्ष; धनगर आरक्षण एकच लक्ष’ असा नारा देत सामूहिक उपोषण करणार आहे. 1 सप्टेंबरला जेजुरी येथून मल्हारी मार्तंड खंडेराया जेजुरीत भंडारा उधळून पंढरपूरच्या दिशेने धनगर बांधव मोठ्या संख्येने येणार आहेत. पंढरपुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये सकल धनगर समाजाच्या वतीने प्राणांतिक उपोषणाची सुरुवात केली जाणार आहे, असं समाजाचे समन्वयक अमोल कारंडे यांनी म्हटलं आहे.

आगामी विधानसभा निवडणुक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. असे असतानाच आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यभर तीव्र पडसाद उमटण्याची शक्यता नाकारता येत नाही. मराठा आणि ओबीसी आंदोलनाचा मुद्दा सध्या राज्यभर गाजत आहे. असं असतानाच आता धनगर आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा समोर आला आहे. महाराष्ट्रात धनगर समाजाकडून पुन्हा एकदा आंदोलन पुकारण्यात येणार आहे. राज्यातील पक्षांनी धनगर आरक्षणाच्या बाबतीत कोणतीही भूमिका घेतली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे आता राज्यातील सर्व धनगर समाजाचे कार्यकर्ते, नेते आमरण उपोषण करणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!