Mumbai : कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर शुक्रवारी (दि. २७) मुंबईतील सर एच. एन. रिलायन्स फाऊंडेशन रुग्णालयात पित्ताशयाची शस्त्रक्रिया झाली. त्यांच्यावर पुढील उपचार सुरू आहेत. पण तरीही त्यांचे काम थांबलेले नाही. शस्त्रक्रियेनंतरही रुग्णालयात बसून त्यांनी बुधवारी (दि.31) पीक विम्यासह सर्व योजनांचा आढावा घेतला.
पंतप्रधान पीक विमा योजनेंतर्गत एक रुपयात पीकविमा ही संकल्पना राबविणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे. खरीप 2024 हंगामात बुधवारी (दि. 31 जुलै) रोजी सकाळी 11 वाजेपर्यंत 1 कोटी 63 लाख 60 हजारपेक्षा अधिक पीकविमा अर्ज दाखल करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे गेल्या 24 तासांत राज्यभरातून तब्बल 5 लाख 74 हजार शेतकऱ्यांनी पीकविमा काढला आहे.
लाखो शेतकऱ्यांनी एक रुपया विमा सहभाग भरून पिकविमा योजनेत याही वर्षी सहभाग घेतला आहे. ३१ जुलै हा विमा भरण्यासाठी अखेरचा दिवस आहे. उर्वरित पात्र शेतकऱ्यांनी आपला विमा तात्काळ भरून घ्यावा. आपला पीक विमा संरक्षित करावा, असे आवाहन मुंडे यांनी केले आहे.
शेतकऱ्यांना मोफत वीज
अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना 7.5 हॉर्सपॉवरपर्यंतच्या कृषी वीज पंपांना पूर्णपणे मोफत वीज देण्याचा निर्णय झाला. त्यानंतर काही दिवसातच याबाबतचा शासन निर्णय राज्यसरकारने निर्गमित करून ‘मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजने’ला आवश्यक निधी उपलब्ध करून दिला. याचा लाभ राज्यातील सुमारे ४४ लाख शेतकऱ्यांना मिळणार असून यासाठी सुमारे १४ हजार ७६० कोटी रुपये निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.
कापूस-सोयाबीनला हेक्टरी ५ हजारांचे अनुदान
२०२३-२४ मधील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना भाव पडल्याने आर्थिक नुकसान सहन करावे लागले. त्या मोबदल्यात कापूस व सोयाबिन उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी ५ हजारांचे अनुदान देण्याची घोषणा केली होती. अर्थसंकल्पीय अधिवेशन पूर्ण होताच या योजनेसाठी सुद्धा सुमारे ४२०० कोटी रुपये अनुदान उपलब्ध करून देण्यात आले आहे. याचा लाभ राज्यातील सुमारे ८३ लाख शेतकऱ्यांना मिळणार आहे.
मुंडेनी शब्द पूर्ण केला
यात राज्यातील सुमारे ५३ लाख ८३ हजार सोयाबीन उत्पादक (एकूण लाभ – २६१२.४८ कोटी) तर सुमारे २९ लाख ९० हजार कापूस उत्पादक शेतकरी (एकूण लाभ – १५४१ कोटी) याप्रमाणे शेतकऱ्यांना लाभाचे वितरण डीबीटीद्वारे थेट संलग्न बँक खात्यांवर करण्यात येणार आहे. यानिमित्ताने धनंजय मुंडे यांनी दिलेला शब्दपूर्ण करून दाखवला आहे.