महाराष्ट्र

RSS : तर फडणवीस पूर्णवेळ प्रचारक झाले असते!

Devendra Fadnavis : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा पगडा; एका घटनेने बदललं आयुष्य

BJP : देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा राज्याचे मुख्यमंत्री होणार आहेत. पक्षाने त्यांची निवड जाहीर केली आणि काही तासांत ते पदाची शपथही घेतील. देवेंद्र फडणवीस यांचं संघाशी असलेलं नातं, बांधिलकी साऱ्या महाराष्ट्राला माहिती आहे. कितीही व्यस्त असले तरीही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दसरा मेळाव्यात ते गणवेशासह उपस्थित राहतात. फडणवीस संघाच्या शब्दाच्या बाहेर नाहीत, असंही बरेचदा बोललं जातं. त्यांच्या उमेदीच्या काळातील आयुष्याकडे बघितलं तर फडणवीस पूर्णवेळ प्रचारक होण्याच्या तयारीत होते. मात्र, एका घटनेने त्यांचं अख्खं आयुष्य बदलून टाकलं.

देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. यापूर्वी 2014 आणि 2019 (72 तास) मध्ये त्यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. 2014 ते 2019 असा सलग पाच वर्षांचा कार्यकाळ त्यांनी उत्तमरित्या पार पाडला. त्यानंतर 2019 मध्ये त्यांच्या व भाजप-शिवसेना युतीच्या कामगिरीला जनतेने साथ दिली. युतीला बहुमत मिळालं. पण मुख्यमंत्रीपदावरून शिवसेनेसोबत वाद झाला. अशात फडणवीस यांनी अजित पवार यांच्यासोबत पहाटे शपथ घेतली. 2019 मधला पहाटेचा हा शपथविधी महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातील मोठी घटना ठरली. पण हे सरकार अवघे 72 तास टिकले. त्यानंतर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले. नंतर शिवसेना फुटली. राष्ट्रवादी फुटली. भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी असे महायुतीचे सरकार आले.

प्रचारक व्हायचे होते

2024 च्या निवडणुकीत चित्र वेगळे होते. महायुतीला बहुमत मिळाले आणि पुन्हा एकदा फडणवीस यांची मुख्यमंत्रीपदी निवड झाली. ते तिसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होत आहेत. पण उमेदीच्या काळात ते एका निर्णयावर ठाम राहिले असते तर कदाचित आज चित्र वेगळे असते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारांचा पगडा त्यांच्यावर पूर्वीपासून आहे. प्रचारकांचे समर्पण बघून भविष्यात संघाच्याच कामात स्वतःला झोकून द्यायचे, असा निर्णय देवेंद्र यांनी घेतला होता. कुटुंबियांकडे त्यांनी तसे बोलूनही दाखवले होते. पण, कायद्याचे शिक्षण घेत असतानाच ते नगरसेवक झाले. नगरसेवक झाल्यानंतर ते कमालीचे व्यस्त झाले आणि विषय मागे पडला.

Devendra Fadnavis : भाऊ मुख्यमंत्री, बहिणींचा विदर्भात जल्लोष 

शिक्षण घेत असतानाच नगरसेवक

‘कायद्याचे शिक्षण घेताना शेवटचे वर्ष संपण्यापूर्वीच देवेंद्र नगरसेवक झाले आणि व्यस्ततेमुळे हळूहळू त्यांच्या डोक्‍यातून तो विचारही मागे पडला,’ असं देवेंद्र यांचे बंधू आशिष फडणवीस यांनी एका मुलाखतीत म्हटले होते. देवेंद्र यांचे वडील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक होते. त्यांनी आमदार झाल्यावरही काम सुरू ठेवले होते. त्यामुळे आपणही सक्रीय राजकारणात राहून संघाचं काम करू शकतो, असा विश्वास देवेंद्र यांना होता. पुढे देवेंद्र फडणवीस महापौर झाले. विधानसभा निवडणुका जिंकल्या आणि 2014 मध्ये पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले. मात्र, एका निर्णयाने त्यांचं आयुष्य बदललं. तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेत असताना या आठवणींना उजाळा मिळत आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!