New CM Of Maharashtra : मुंबईतील आझाद मैदानावर सध्या शपथविधी सोहळ्याची शाही तयारी सुरू आहे. महायुती सरकारच्या दुसऱ्या इनिंगला या शपथविधी सोहळ्यानंतर सुरुवात होणार आहे. भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. हे जवळपास निश्चित झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह 22 राज्यांचे मुख्यमंत्री शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.
गुरुवारी (5 डिसेंबर) मुंबईतील आझाद मैदानावर हा शपथविधी सोहळा होणार आहे. महायुतीमधील तिन्ही घटकपक्षांनी या सोहळ्याचे सर्वच महत्त्वाच्या नेत्यांना निमंत्रण देण्यात आले आहे. यात उत्तर प्रदेश, गुजरात, आंध्र प्रदेश हरियाणा या भाजप शासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसह देशभरातील विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना व राजकीय पक्षांच्या नेत्यांचा समावेश आहे. याशिवाय विविध राज्यांचे राज्यपालही या शपथविधी सोहळ्याला हजर राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबई पोलीस सुरक्षेच्या दृष्टीने मोठ्या प्रमाणावर उपाय करीत आहेत.
महायुतीच्या या सोहळ्याला 40 हजार कार्यकर्तेही या सोहळ्याला हजर राहणार आहेत. यात ‘एक है तो सेफ है’ चा संदेश देणारे टी शर्ट परिधान केलेल्या 10 हजार कार्यकर्त्यांचाही समावेश असेल. शपथविधी सोहळ्यासाठी निमंत्रित केले आहे. यात फडणवीस यांचे चाहते असणाऱ्या गोपाल बावनकुळे यांचाही समावेश आहे. गोपाल बावनकुळे हे नागपूरच्या रामनगर परिसरात चहाचा स्टॉल चालवतात.
धक्का तंत्र नाही
भारतीय जनता पार्टीकडून अखेरच्या क्षणी नका तंत्राचा वापर केला जाईल, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. मात्र भाजपच्या नेत्यांनी यासंदर्भात नकार दिला आहे. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील, असे भाजपच्या जवळपास सर्वच नेत्यांचे दावे आहेत. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा आता नव्या सरकारच्या शपथविधी सोहळ्यासाठी सक्रिय झाले आहेत. भाजप आणि शिवसेनेच्या काही नेत्यांनी आझाद मैदानावरील तयारीची पाहणी केली. या संयुक्त पाहणी मुळे शिवसेना आणि भाजपमध्ये कोणताही वाद नसल्याचा संदेश गेला आहे.
महायुतीच्या शपथविधी सोहळ्याला अनेक साधुसंत देखील येणार आहेत. यामध्ये इस्कॉन आणि जैन धर्मातील संतांचाही समावेश आहे. ही सर्व मंडळी नव्या सरकारला आशीर्वाद देणार असल्याचे सांगण्यात आले आहे. नाणीज पिठाचे नरेंद्र महाराज, भगवानगडचे नरेंद्र शास्त्री, जैन मुनी लोकेश हे देखील शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. दिल्लीवरून परतल्यानंतर काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आजारी आहेत. त्यामुळे शपथविधी सोहळ्यापूर्वी त्यांची प्रकृती उत्तम व्हावी असे प्रयत्न डॉक्टर करीत आहेत.