ठाण्यातील बदलापुरात दोन मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचारानंतर आंदोलन तीव्र झाले आहे. स्थानिक नागरिक आणि आंदोलकांनी काही महत्त्वाच्या मागण्या मांडल्या आहेत. आंदोलकांनी विशेषत: कायदेशीर कारवाई वेगवान करण्यासाठी आणि आरोपींना फाशी देण्यासाठी जलदगती न्यायालये निर्माण करण्याची मागणी केली. यावर हा खटला जलदगती न्यायालयात चालवला जाईल आणि आरोपींना कठोर शिक्षा होईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. तर पोलिस पथकाने कारवाईत दिरंगाई केल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. त्या अधिकाऱ्यांच्या निलंबनाची मागणीही केली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंदोलकांची मागणी मान्य करत उशिरा प्रतिसाद देणाऱ्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सहायक उपनिरीक्षक आणि हेड कॉन्स्टेबल या अधिकाऱ्यांना निलंबित करण्याचे निर्देश पोलिस आयुक्तांना दिले.
बदलापूर येथे घडलेली घटना अतिशय घृणास्पद आहे. ही घटना मन हेलावून टाकणारी आहे. या प्रकरणात वरिष्ठ आयपीएस अधिकारी आरती सिंग यांच्या अध्यक्षतेत एसआयटी गठीत करण्याचे तसेच, कर्तव्यात कसूर करणार्या तीन पोलिसांना निलंबित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या घटनेत जलदगती न्यायालयात खटला चालविण्यासाठी सुद्धा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश ठाणे पोलीस आयुक्तांना देण्यात आले आहेत. या खटल्यासाठी विशेष सरकारी वकील म्हणून ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मंगळवारी नवी दिल्ली येथे उपमुख्यमंत्र्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
ठाणे पोलीस आयुक्तांना असे आहेत आदेश
बदलापूरच्या घटनेत प्रारंभीच्या काळात कर्तव्यात कुचराई करणारे बदलापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आणि हेडकॉन्स्टेबल यांना तत्काळ निलंबित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाणे पोलीस आयुक्तांना दुपारीच आदेश दिले असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच या घटनेचा वेगाने तपास करुन खटला जलदगती न्यायालयात चालविण्यात येईल. विशेष सरकारी वकील म्हणून ज्येष्ठ विधिज्ञ उज्वल निकम यांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असेही फडणवीस म्हणाले.
आंदोलकांकडून शाळेची तोडफोड
बदलापूर पूर्व येथील एका नामांकित शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार करण्यात आला. या घटनेच्या निषेधार्थ मंगळवारी बदलापूरमधील नागरिक रस्त्यावर उतरले. नागरिकांकडून तीव्र निदर्शनं सुरू आहेत. या दोन मुलींना न्याय मिळवून देण्यासाठी आज बदलापूर बंदची हाक देण्यात आली आहे. ज्या ठिकाणी अत्याचाराची घटना घडली, त्या शाळेत बदलापूरकरांचा उद्रेक पाहायला मिळाला. आंदोलकांनी शाळेची तोडफोडही केली.