Assembly Election : विधानसभा निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. सर्वच राजकीय पक्ष व नेते निवडणुकीची जोरदार तयारी करीत आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक नेते राज्यातील विविध भागांत दौऱ्यावर असून, निवडणुकीचा आढावा घेत आहेत. अशातच महायुतीत धुसफूस सुरु असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात चांगलीच रंगली आहे. शिवसेना शिंदे गटातील नेते रामदास कदम यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यावर वक्तव्य केले. चव्हाण यांचा राजीनामा फडणवीस यांनी स्वीकारावा, असे रामदास कदम म्हणाले. यानंतर आता महायुतीत चांगलीच अस्वस्थता निर्माण झाली आहे.
मंत्री रवींद्र चव्हाण अत्यंत कुचकामी आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी रविंद्र चव्हाण यांचा राजीनामा घ्यावा, असे वक्तव्य रामदास कदम यांनी केले. आता देवेंद्र फडणवीस यांनी कदम यांच्या या विधानावर प्रतिक्रिया देत त्यांना चांगलेच ठणकावले आहे. “रामदास कदम वारंवार टोकाचं बोलतात, त्यांच्या अशा विधानाने आमचे मन दुखावले गेले आहे, असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी रामदास कदम यांना खडेबोल सुनावले आहेत.
फडणवीसांनी सुनावले खडेबोल
रामदास कदम यांच्या विधानाला प्रतिक्रिया देत देवेंद्र फडणवीस म्हणाले की, रामदास कदम यांच्या विधानावर आम्हालाही तोंड देता येते. आम्ही देखील 50 गोष्टी बोलू शकतो. रामदास कदम वारंवार अशाच पद्धतीची टोकाची भाषा बोलतात. त्यामुळे आमचे देखील मन दुखावलं जातं. शेवटी आम्हीही माणसच आहोत. पण जे मोठे नेते आहेत, त्यांनी काहीतरी पथ्य पाळायला हवे. त्यांनी आपल्या पक्षातील नेत्यांना समजवायला हवे. भारतीय जनता पक्षाला, अशा प्रकारचं वारंवार बोलणं आणि पक्षातील नेत्यांवर टीका करणे आम्हाला मान्य नाही. याबाबतीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी मी चर्चा करेल, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
महायुती सरकारच्या लाडकी बहीण योजनेला बंद पाडण्यासाठी विरोधकांनी काटेकोरपणे प्रयत्न केले. परंतु त्यांना योजना बंद पाडण्यात यश प्राप्त झाले नाही. आता लाडकी बहीण योजनेला कशाप्रकारे मागे खेचता येईल, यासाठी विरोधक प्रयत्न करीत आहेत. मात्र जनता त्यांना प्रश्न विचारेल की, तुम्हाला एवढ्या वेळा संधी मिळाली तेव्हा तुम्हाला बहिणींची आठवण का नाही आली? महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींनादेखील माहिती आहे की, आता त्यांच्या पाठीशी महायुती सरकार उभे आहे”, अशी टीका फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर केली.
नेमकं काय म्हणाले होते कदम?
रामदास कदम म्हणाले होते की, मुंबई-गोवा येथील मार्गावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. येथील रस्त्याचा पाहणी दौरा सुरू आहे, तो म्हणजे चमकोगिरी करण्यासाठी. हा पाहणी दौरे कशासाठी? कदम अत्यंत कुचकामी मंत्री आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांचा राजीनामा घ्यायला पाहिजे. , अशी टीका रामदास कदम यांनी केली होती
चव्हाण यांनीही दिले प्रत्युत्तर
मंत्री रवींद्र चव्हाण यांनीही रामदास कदम यांना प्रत्युत्तर दिले आहे. चव्हाण म्हणाले की, मागील 40 वर्षांच्या कार्यकाळात रामदास कदम मंत्री, आमदार म्हणून कोकणाचे नेतृत्व करीत आहेत. या कालावधीत त्यांनी विकास कामे तर सोडाच, पण इतर विकास कामांचे कोणते दिवे लावलेले आहेत आधी ते स्पष्ट केले पाहिजे, अशा शब्दात त्यांच्यावर संतप्त झालेले रवींद्र चव्हाण यांनी कदम यांना सुनावले.