Stand Of Mahayuti : विधानसभा निवडणुकीच्या काळात सर्वाधिक बंडाचे झेंडे महायुतीमध्ये उभे झाले आहेत. महाविकास आघाडीच्या तुलनेत बंडखोरांची संख्या महायुतीत जास्त आहे. अशात भाजपच्या अनेक नेत्यांनी तर मुंबईत तंबुच ठोकला आहे. अनेक मतदारसंघातील बंडखोरांची समजूक काढण्यासाठी काय करता येईल, याची यादीच तयार करण्यात आली आहे. दिवाळीपूर्वी कोणाला काय ‘ऑफर’ द्यायची, यासाठी ‘प्लानिंग’ तयार करण्यात येत आहे. अशातच देवेंद्र फडणवीस यांनी बंडखोर उमेदवारांबाबत भाष्य केलं आहे.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारी देण्याच्या मुद्द्यावरून धुसफूस सुरू आहे. अनेक निष्ठावान पदाधिकाऱ्यांना संधी मिळालेली नाही. आयारामांना संधी देण्यात आली आहे. त्यामुळे जुन्या नेत्यांमध्ये नाराजी आहे. यातूनच महायुतीत बंडखोरी वाढली आहे. काहींनी पक्षांतर करून दुसऱ्या पक्षाकडून उमेदवारी पदरात पाडून घेतली आहे. अशा सर्वांसाठी फडणवीस यांनी मोलाचा सल्ला दिला आहे.
संवादावर भर
उमेदवारांची यादी जाहीर झाल्यानंतर अनेक जुने कार्यकर्ते नाराज झाले आहेत. या नाराजीतून त्यांनी अपक्ष अर्ज भरले आहेत. काही ठिकाणी बंडखोरी झाली आहे. एकमेकांच्या उमेदावारांविरोधात अर्ज भरण्यात आले आहेत. यासाठी आता रणनीती तयार करण्यात आली आहे. काहींनी तिकिट मिळाले नसताना उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यांना पक्षात परत घेण्याचा प्रयत्न होणार आहे. केवळ भाजप हा प्रयत्न करणार नाही. महायुतीमधील तीनही पक्ष हा प्रयत्न करतील. पक्षांतर्गतही काही उमेदवार उभे राहिले आहेत. त्यांनाही विश्वासात घेण्यात येणार असल्याचं फडणवीस यांनी स्पष्ट केलं.
बंडखोरीनंतर अनेकांनी अर्ज दाखल केले आहेत. अर्जांची छाननी प्रक्रियाही झाली आहे. अपेक्षित सर्व अर्ज वैध ठरले आहेत. आता दोन दिवस दिवाळी आहे. त्यामुळं या काळात सर्व नाराजांशी संपर्क साधण्यात येणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत अनेक ठिकाणी बंडखोरीचं वादळ शांत झालेलं दिसेल, असंही फडणवीस म्हणाले. पाच नोव्हेंबरनंतर खरा प्रचार सुरू होईल. महायुती प्रचारासाठी सज्ज आहे. भाजपात येत्या काही दिवसात मोठे पक्षप्रवेश होतील. काँग्रेसचे नेतेही येतील. पण ते कोण हे विचारू नका, असं फडणवीस म्हणाले.
सकारात्मकता..
महायुतीचं सरकारच सत्तेत येणार आहे. महायुतीसंदर्भात लोकांमध्ये सकारात्मकता आहे. नामांकन प्रक्रिया पूर्ण झाली आहे. काही ठिकाणी ‘क्रॉस फॉर्म’ आले होते. त्यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह आपण आणि महायुतीचे प्रमुख नेते चर्चा करीत आहोत. महायुतीमधील सगळे मुद्दे संपवले आहेत. सगळ्यांना त्याचा प्रत्यय काही तासात दिसेल असा दावाही फडणवीस यांनी केला.