BJP Vs Congress : सिंधुदुर्ग येथील राजकोट किल्ल्यावर बसवण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. आता यावर महाराष्ट्रातील राजकारण तापले आहे. महाविकास आघाडीने रविवारी (ता. 1) सरकारला जोडे मारो आंदोलन केले. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. फडणवीस यांनी हे आंदोलन राजकीय हेतूने प्रेरित असल्याची टीका केली आहे. ते नागपुरात बोलत होते. महाविकास आघाडीचे जे आंदोलन होत आहे, ते पूर्णपणे राजकारण आहे, असे फडणवीस म्हणाले.
महाविकास आघाडी किंवा काँग्रेस कुणीही छत्रपती शिवरायांचा सन्मान केला नाही. पंडीत नेहरु, इंदिरा गांधी यांनी लाल किल्ल्यावरुन केलेली भाषणं आठवा. एकाही भाषणात छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा उल्लेखही नव्हता. पंडीत नेहरुंनी डिस्कव्हरी ऑफ इंडिया या पुस्तकात छत्रपती शिवरायांचा अपमान केला. छत्रपती शिवाजी महाराजांनी सूरतला लुटले असे काँग्रेसनेच मुलांना अभ्यासक्रमातून शिकविले. याबद्दल महाविकास आघाडी आणि काँग्रेस पक्ष माफी मागणार का? असा सवाल फडणवीस यांनी केला.
हे महापाप
मध्य प्रदेशात कमलनाथ (Kamalnath) मुख्यमंत्री असताना छत्रपती शिवरायांचा पुतळा बुलडोझरने हटविला. तेव्हा काँग्रेसचे शिवाजी महाराजांबद्दलचे प्रेम कुठे गेले होते. कर्नाटकात छत्रपती शिवरायांचा पुतळा तोडण्यात आला. कर्नाटकातही काँग्रेसचे सरकार होते. तेव्हा काँग्रेस झोपली होती का? त्याबद्दल काँग्रेस माफी मागणार का? असे फडणवीस म्हणाले. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर याच काँग्रेसने शिकवलं की छत्रपती शिवाजी महाराजांनी सूरत लुटली. छत्रपती शिवरायांनी सूरत लुटलीच नाही. उलट सूरतच्या लोकांनी तिथे छत्रपतींचा पुतळा बसवला आहे. काँग्रेसने महापुरुषांबद्दल चुकीचा इतिहास शिकवला. त्यामुळे 50 वर्ष केलेल्या महापापाबद्दल काँग्रेसने माफी मागावी, असे फडणवीस म्हणाले.
Shivaji Maharaj Statue : आघाडीकडून निषेध; महायुतीकडून निषेधाचा निषेध
सिंधुदुर्ग येथील राजकोट किल्ल्यावर बसवण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. 26 ऑगस्टला ही घटना घडली. तेव्हापासून महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप होत आहेत. पुतळ्यावरून महाविकास आघाडी सतत सरकारवर प्रचंड टीका करीत आहे. महाराष्ट्र सरकारला शिवद्रोही संबोधले जात आहे. या घटनेचा निषेध करत महाविकास आघाडीने मुंबईत निषेध मोर्चा काढला. सरकारला जोडे मारो आंदोलन केले. त्यानंतर फडणवीस यांनी नागपुरात महाविकास आघाडीवर टीका केली.
आव्हाडांचा प्रश्न
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी फडणवीस यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेतला आहे. आव्हाड यांनी यासंदर्भात ट्विट केले आहे. शिवाजी महाराजांनी सूरत सुटले नाही. हा चुकीचा इतिहास आहे. महाराजांच्या शौर्यावर आक्षेप घेणे हा गुन्हा आहे. त्यामुळे फडणवीस यांनी महाराजांचा अपमान का केला, असा सवाल आव्हाड यांनी विचारला आहे. मालवण येथील घटनेनंतर महाविकास आघाडी आणि महायुतीच्या ट्रोलर्स कडून अनेक व्हिडीओ पोस्ट करण्यात येत आहे. यात शिवाजी महाराज यांच्या कोणी कसा अवमान केला हे दाखविण्यासाठी स्पर्धाच सुरू झाली आहे.