BJP News : देशाच्या कल्याणार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक योजना राबविल्या. देशाचे कल्याण फक्त मोदीच करू शकतात. नरेंद्र मोदींनी गरीब कल्याण योजना आणली. देशात 25 कोटी लोक गरीबी रेषेच्यावर आले आहेत. त्यामुळे भारताला भविष्यामध्ये सशक्त बनवायचे असेल तर नरेंद्र मोदी यांच्याशिवाय पर्याय नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे ठाम प्रतिपादन केले. खासदार सुनील मेंढे यांच्या प्रचारार्थ भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथे आयोजित सभेत ते बोलत होते.
खासदार सुनील मेंढे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे, माजी मंत्री डॉ. परिणय फुके आधी यावेळी उपस्थित होते. 60 कोटी लोकांच्या घरी पिण्याचे शुद्ध पाणी पोहोचले आहे. बचत गटाच्या माध्यमांतून महिलांना रोजगार निर्मिती करुन देण्यात आली आहे. तरुण लोकांना 10 लाखांचा विमा गॅरंटी देण्यात आली आहे. 24 हजार कोटींची योजना आदिवासी बांधवांसाठी तयार करण्यात आली आहे. देशाच्या इतिहासातील 60 टक्के मंत्री ओबीसी आणि इतर समाजाचे आहेत. त्यामुळे नरेंद्र मोदी यांच्या सरकारमध्ये सर्व समाजाला समतोल संधी देण्यात आल्याचे, देवेंद्र फडणवीस म्हणाले.
राहुल उमेदवारालाच विसरले
काँग्रेसच्या प्रचारार्थ राहुल गांधी आपल्याकडे विदर्भात आले होते. संपूर्ण भाषणात त्यांनी देव मोदींना दुषणे दिली. मात्र आपल्या पक्षाच्या उमेदवाराचा साधा उल्लेखही त्यांनी भाषणात केला नाही. काँग्रेसच्या उमेदवारांनी आतापर्यंत काय काय केले, हे राहुल गांधी सांगू शकले नाहीत. त्यामुळे राहुल गांधी यांच्याकडे अजेंडाच नाही हे सिद्ध होते. याउलट भाजप सरकारने आतापर्यंत काय केले, याची यादीच आपल्याकडे आहे, असे फडणवीस यांनी नमूद केले.
पाण्याची समस्या सुटली
भंडारा जिल्ह्यातील तुमसर शहराला पाणीपुरवठा योजनेसाठी 100 कोटींपेक्षा जास्त रुपयांचा निधी दिला आहे. आता सौर कृषी योजना आली आहे. प्रत्येक शेतकऱ्यांचे कृषी पंप सोलरवर चालणार आहे. 80 कोटी लोकांना पुढचे पाच वर्ष मोफत रेशन देण्याची योजना मोदींनी आणली आहे. त्यामुळे देशाचा विकास साधायचा असेल तर नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करणे गरजेचे आहे. यासाठी प्रत्येक खासदाराला निवडून देणे गरजेचे आहे. भंडारा-गोंदिया मतदार संघातील मतदारांनी मोदींचे हात बळकट करण्यासाठी विचारपूर्वक मतदान करावे, असे आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी केले.