Chatrapati Shivaji Maharaj : छत्रपती संभाजी महाराज समुद्रात शिवस्मारक शोधायला निघाले आहेत. या प्रश्नावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती संभाजी महाराजांना खोचक सल्ला दिला. देवेंद्र फडणवीस म्हणाले, शिवस्मारक समुद्रात झाले पाहिजे, ही शिवभक्तांची इच्छा आहे. केवळ या स्मारकाच्या विरोधात कोर्टामध्ये जाऊन स्थगिती आणणारे कोण आहेत. ते कोणाचे वकील आहे, हे छत्रपती संभाजी राजेंनी बघितलं पाहिजे. काँग्रेसचा अधिकृत प्रचार करणारे वकील कोर्टात जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक होऊ नये, म्हणून स्थगिती आणत आहेत. त्याचाही निषेध संभाजी राजांनी केला पाहिजे. फडणवीस खामगावात (Khamgaon) भारतीय जनता पार्टीच्या एका कार्यक्रमात आले असता बोलत होते.
अरबी समुद्रामध्ये उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे काम अद्यापही सुरू झालेले नाही. त्यामुळे स्वराज्य पक्षाचे नेते माजी खासदार संभाजीराजे छत्रपती आक्रमक झाले आहेत. 2016 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे जलपूजन पार पडले होते. मात्र त्यानंतर अद्यापही स्मारकाचे काम झालेले नाही. त्यामुळे संभाजीराजे छत्रपतींनी सत्ताधाऱ्यांवर ताशेरे ओढले. मुंबईत संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्वात समुद्रातील शिवस्मारकाचा शोध घेण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. यावेळी पोलिसांकडून संभाजीराजेंना रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला. या सगळ्या प्रकरणावरुन आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलं आहे.
शिवाजी महाराजांचा मुद्दस
अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाची पाहणी करण्यासाठी संभाजीराजे छत्रपती हे त्यांच्या स्वराज्य पक्षाच्या कार्यकर्त्यांसह ‘गेट वे ऑफ इंडिया’ येथे पोहोचले होते. यावेळी त्यांना पोलिसांनी रोखण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान धक्काबुक्की देखील झाली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना संभाजीराजेंनी सरकारवर टीकास्त्र डागलं. केंद्रात तुमचं सरकार. राज्यात देखील तुमचं सरकार. स्मारकाचं जलपूजनही तुम्हीच केलं. मग स्मारक का झालं नाही?, असा सवाल यावेळी संभाजीराजे छत्रपतींनी केला. त्यावर बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संभाजीराजेंनी या कामासाठी स्थगिती आणणाऱ्यांचाही निषेध केला पाहिजे असं म्हटलं आहे.
स्मारक झालं पाहिजे ही तमाम शिवभक्तांची इच्छा आहे. केवळ या स्मारकाच्या विरोधात कोर्टामध्ये जाऊन स्थगिती आणणारे कोण हे छत्रपती संभाजीराजे यांनी शोधावे. हेच लोक कोर्टात जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक होऊ नये म्हणून स्थगिती आणत आहेत. त्यामुळे त्यांचाही संभाजीराजेंनी निषेध केला पाहिजे. आम्ही कोर्टात भांडत आहोत. आम्ही ते स्मारक कोर्टाकडून मंजूर करुन घेऊ, असंीर देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.
नेत्यांची इच्छा
मुंबईत छत्रपती शिवाजी महाराजांचं मोठं स्मारक व्हावं, ही त्यावेळी सर्व नेत्यांची इच्छा होती. 2016 मध्ये मुंबई महापालिका निवडणुकीच्या (BMC Election) अगदी काही दिवस अगोदर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते जलपूजन करण्यात आलं. पंतप्रधान मोदी ज्यावेळी जलपूजन करण्यासाठी येतात, याचा अर्थ सर्व परवानगी आहेत. त्याशिवाय पंतप्रधान जलपूजनासाठी येणार नाहीत. तेव्हा आपण देखील उपस्थित होतो. आपल्यालाही याचं कौतुक वाटलं. त्यानंतर सरदार वल्लभभाई पटेल यांचं स्मारक उभा राहिलं. पण 2016 मध्ये जलपूजन झाल्यावरही स्मारक उभं राहिलं नाही. त्यासाठी समितीही स्थापन झाली. मात्र त्यानंतर पुढे काय झालं? असा सवाल संभाजीराजे छत्रपती यांनी केला.