Sindhudurg : मालवण राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्यानंतर सर्वत्र संतापाची लाट पसरली आहे. बुधवारी (ता. 28) महाविकास आघाडीचे नेते पाहणीसाठी तेथे गेले. याच दरम्यान भाजप खासदार नारायण राणे आणि निलेश राणे हे देखील कार्यकर्त्यांसह तिथे पोहोचले. यावेळी ठाकरे विरुद्ध राणे असा संघर्ष पाहायला मिळाला.
नारायण राणे यांनी वादग्रस्त विधान केलं. “घरात खेचून एकेकाला रात्रभर मारून टाकेन”, असं नारायण राणे म्हणाले. राणे यांच्या या वक्तव्यावरून विरोधकांकडून राणे यांनी लक्ष केलं जातं आहे. आता यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, नारायण राणे यांची बोलायची पद्धतच तशी आहे. ते धमकी देतील, असे वाटत नाही.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण राजकोटमध्ये बसवण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा फक्त 8 महिन्यातच कोसळला. यावरून राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप- प्रत्यारोपाच्या फैरी झाडत आहेत. अशातच आज मालवणमध्ये शिवसेना ठाकरे गट विरुद्ध नारायण राणे असा सामना पाहायला मिळाला. आज महाविकास आघाडीचे नेते पाहणीसाठी तिथे गेले असतानाच भाजप खासदार नारायण राणे आणि भाजप नेते निलेश राणे हे देखील कार्यकर्त्यांसह तिथे पोहोचले.
शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते आणि राणे समर्थक यांच्यात मोठा संघर्ष पाहायला मिळाला. जवळपास दोन तासांपेक्षा जास्त वेळ राजकोट किल्ल्यावर जोरदार घडामोडी घडल्या. अखेर पोलिस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मध्यस्ती करण्याचा प्रयत्न केला. याच दरम्यान नारायण राणे यांच्या एका वक्तव्यावरून राजकारण तापलं आहे. विरोधकांच्या निशाण्यावर नारायण राणे असतानाच आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
राणेंची बोलण्याची पद्धत आहे. ते बोलताना आक्रमक असतात. पण ते धमक्या देतील असं वाटत नाही. असे ज्याप्रकारे शिवरायांच्या पुतळ्याची घटना आहे. त्यावर कोणीच राजकारण करू नये हे मत आहे. ही घटना सर्वांसाठी कमीपणा आणणारी आहे. दु:खद आहे. त्याचवेळी अशी घटना झाल्यावर त्याची योग्य चौकशी झाली पाहिजे. दोषींवर कारवाई झाली पाहिजे. तिथे भव्य पुतळा उभारला पाहिजे. या तिन्ही गोष्टीची कार्यवाही सुरू आहे. नेव्हीने चौकशी समिती स्थापन केली आहे. नेव्ही या संदर्भात चौकशी करून कारवाई करेल. दोषींवर कारवाई करेल. घटनेकरता कोणती गोष्ट जबाबदार होती. त्यात कोणती त्रुटी होती ते पाहिल”, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.