Akola constituency : लोकसभा निवडणुकीत ‘अबकी बार चारसौ पार’ चा नारा देत भाजपकडून जोरदार प्रचाराचे रणशिंग फुंकण्यात आले. दुसऱ्या टप्प्यात अकोला लोकसभा मतदारसंघात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या मतदारसंघात प्रचाराला सुरुवात झाली आहे. भाजपच्या स्टार प्रचारकाची पहिलीच सभा अकोल्यात होत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भाजप उमेदवार अनुप धोत्रे यांच्यासाठी मूर्तिजापूर येथे प्रचारसभा घेत आहेत. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी भाजपकडून प्रयत्न करण्यात येत असल्याची माहिती आहे.
लोकसभा निवडणुकीचे टप्पे 19 एप्रिलपासून देशभरात सुरु होणार आहेत. 19 एप्रिल ते 1 जून या कालावधीत सात टप्प्यात लोकसभा निवडणूक पार पडणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपाने यावेळी अबकी बार 400 पार हा नारा दिला आहे. भाजपाने या निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. अकोल्यात दुसऱ्या टप्प्यात म्हणजेच 26 एप्रिल रोजी मतदान पार पडणार आहे. यासाठी सर्वच पक्षाकडून जोरदार सुरू असतानाच भाजपकडून स्टार प्रचारकांना पुढे करीत प्रचाराला सुरुवात झाली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अनुप संजय धोत्रे यांच्या प्रचारार्थ अकोला जिल्ह्यात गुरुवार (ता. 18 एप्रिल) रोजी येत आहेत. त्यांची जाहीर सभा चे आयोजन करण्यात येत असल्याची माहिती भाजप सूत्रांनी दिली. मूर्तिजापूर येथे जाहीर सभेला सकाळी दहा वाजता वाजता संबोधित करणार आहेत. या दृष्टीने जय्यत तयारी भाजपकडून सुरू करण्यात आली आहे. अकोला जिल्ह्यात राजकीय पक्षाची ही पहिली जाहीर सभा आहे. या जाहीर सभेकडे राजकीय वर्तुळाचे व नागरिकांचे लक्ष लागले आहे.
मोदी यांची सभा 21 एप्रिलला होण्याची शक्यता!
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी देखील अकोला भाजपकडून प्रयत्न करण्यात येत असल्याची माहिती आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांची सभा पार पडली होती. त्याचा मोठा फायदा भाजपला झाला होता. आता पुन्हा अनुप धोत्रे यांच्या साठी ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा व्हावी अशी मागणी करण्यात येत आहे. दरम्यान ही सभा 21 एप्रिल ला होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.