Mahayuti vs Mahavikas Aghadi : राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यासाठी चार मुद्यांवर खोटे प्रतिज्ञापत्र तयार करुन द्या. तुम्ही माझे ऐकले तर तुमच्यावर कुठलीही कारवाई होणार नाही, असा दबाव राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 3 वर्षांपूर्वी माझ्यावर आणला होता, असा गौप्यस्फोट राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे.
अनिल देशमुख यांच्या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे. ‘माझ्यावर दबाव टाकण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी माझ्याकडे त्यांच्या विश्वासातील एकाला पाठविले होते. मी जर ते प्रतिज्ञापत्र 3 वर्षांपुर्वी करुन दिले असते तर तेव्हाच महाविकास आघाडीचे सरकार पडले असते,’ असेही अनिल देशमुख यांनी म्हटले आहे.
तीन वर्षांपूर्वी राज्यात महाविकास आघाडीचे सरकार होते. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते व अजित पवार उपमुख्यमंत्री होते. माझ्याकडे गृहखात्याची जबाबदारी होती. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी तत्कालीन पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांना माझ्यावर शंभर कोटींचा खोटा आरोप करायला लावला. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा अत्यंत विश्वासू माणूस माझ्याकडे पाठवला. त्याने माझे आणि फडणवीस यांचे फोनवरून बोलणे करून दिले. त्यानंतर अनेकदा तो माझ्याकडे आला. प्रत्येक वेळी त्याने माझे आणि फडणवीस यांचे फोनवरून बोलणे करून दिले, असेही देशमुख यांनी म्हटले आहे.
आणि एक दिवस..
एकदा फोनवर देवेंद्र फडणवीस म्हणाले की ‘मी काही कागदपत्रे तुमच्याकडे पाठवतो ती जरा पाहून घ्या.’ त्यानंतर तो माणूस कागदपत्रे घेऊन आला. त्याने माझे त्याच्या मोबाईलवरुन देवेंद्र फडणवीस यांचे बोलणे करुन दिले. देवेंद्र फडणवीस यांनी मला सांगीतले की, ‘जी कागदपत्रे मी पाठविली आहेत त्यातील 4 मुद्यांनुसार आपण प्रतिज्ञापत्र करुन द्या.’
प्रतिज्ञापत्रात काय अपेक्षित होते?
अनिल देशमुख यांनी केलेल्या दाव्यानुसार त्यांच्याकडून खालील मुद्दे फडणवीस यांना प्रतिज्ञापत्रात अपेक्षित होते. ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गृहमंत्री म्हणून मला त्यांच्या वर्षा सरकारी निवासस्थानी बोलावलं. ते मला म्हणाले, ‘मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जवळ आली आहे. त्यासाठी मला पैशांची गरज आहे आपण मला तीनशे कोटी रुपये जमा करून द्या,’ असा खोटा आरोप उध्दव ठाकरे यांच्यावर लावायला त्यांनी सांगितले होते.
उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव तत्कालीन कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांना दिशा सालियान या खोट्या प्रकरणात अडकवण्यासही सांगण्यात आले. ‘पोलिसांकडून मला म्हणजे गृहमंत्र्यांना मिळालेल्या माहितीनुसार सुशांत सिंह राजपूत याची आधीची मॅनेजर दिशा सालीयान हिच्या पार्टीला आदित्य ठाकरे गेले होते. तिथे आदित्य ठाकरे यांनी ड्रिंक घेतल्यावर दिशावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. जेव्हा तिने आरडाओरड करायला सुरुवात केली तेव्हा आदित्य यांनी तिला बाल्कनीतून खाली फेकले त्यामुळे तिचा मृत्यू झाला,’ असे मी प्रतिज्ञापत्रात लिहावे असे त्यांनी म्हटले.
‘तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयातील कार्यालयात मंत्री म्हणून मला बोलून घेतलं. तिथे त्यांचा मुलगा पार्थ पवार देखील होता. दादांनी सांगितलं महाराष्ट्रात गुटखा आणि पान मसाल्याचा मोठा धंदा आहे. त्यांच्याकडून आपल्याला पैसे वसुली करायची आहे. त्यामुळे त्यांच्याकडून वसुलीचे काम पार्थ पवार करतील. तुम्ही फक्त गृहमंत्री म्हणून त्यांना मदत करा,’ असा खोटा आरोप अजितदादावर लावायला सांगीतले.
याच प्रतिज्ञापत्रात असेही खोटं लिहिण्यात आलं होतं की, ‘शिवसेना नेते तत्कालीन मंत्री अनिल परब यांनी मला म्हणजे गृहमंत्र्यांना सांगितलं की दापोलीच्या साई रिसॉर्ट मध्येच त्यांचे पैसे लागलेले आहेत. सर्व पैसे त्यांचेच आहेत फक्त कागदोपत्री मालकी सदानंद कदम यांची दाखवण्यात आली आहे. या प्रकरणात तक्रार करण्यात आली तर फक्त गृहमंत्री म्हणून मी त्यांना मदत करावी,’ असा खोटा आरोप मला अनिल परब यांचावर प्रतिज्ञापत्र करायला सांगीतले.