महाराष्ट्र

Nitesh Rane : पोलिस खात्यातून सडके आंबे काढून फेका

Nagpur : फडणवीस यांचे नाव बदनाम होण्यामागचे सांगितले कारण

BJP Leader : काही अधिकाऱ्यांमुळे पोलिस विभाग बदनाम होत आहे. प्रशासनातील काही भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणीस यांचे नाव बदनाम होत आहे. कामचोरी करणाऱ्या अशा सडक्या आंब्याना काढून टाकण्याचा आम्ही इशारा दिला आहे, असे भाजप नेते नितेश राणे म्हणाले. नितेश राणे यांनी नागपुरात प्रसार माध्यमांशी संवाद साधला. 

हिंदू समाजातील लव्ह जिहादचे प्रकरण आल्यास पोलिस प्रशासनातील काही अधिकारी व कर्मचारी 10 ते 15 तास उलटून जातात तरीही तक्रार दाखल करत नाहीत. प्रशासनातील काही कर्मचारी त्यांचे कर्तव्य काळजीपूर्वक करत नाहीत. पोलिस विभागातील काही अधिकारी त्यांची जबाबदारी ठामपणे पार पाडत नाहीत. यामुळेच देवेंद्र फडणवीस यांचे नाव खराब होत आहे. प्रशासनातील अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात यावे, अशी मागणीही राणे यांनी केली.

राजकीय भाष्य टाळावे 

मनोज जरांगे पाटील यांनी स्वतःच्या वक्तव्यांना आवरले पाहिजे. मराठा समाजाच्या जनतेला त्यांची राजकीय भाषा आवडत नाही. त्यांनी राजकीय वक्तव्य करणे टाळले पाहिजे. जरांगे यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरच बोलणे त्यांच्या हिताचे आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार (Sharad Pawar) आणि काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांची भूमिका मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण न देता किंवा दुसऱ्याच्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण देण्याची आहे. परंतु उद्धव ठाकरे यांनी आरक्षणाबाबत अद्यापही कोणती भूमिका घेतलेली नाही. त्यामुळे जरांगे पाटील एकटे पडत आहेत, असेही नितेश राणे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना म्हणाले. (Nitesh Rane Speaks on Maratha Reservation)

मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याची तयारी असल्यास जरांगे यांनी भूमिका घ्यावी. मनोज जरांगे यांच्या राजकारणामुळे संपूर्ण मराठा समाजाचे नुकसान होईल. मराठा समाज नक्कीच यावर भूमिका घेईल. जरांगे पहिल्या दिवसापासून एकाच भूमिकेवर ठाम राहिले असते तर विश्वास ठेवता आला असता. परंतु आता चारही बाजुंनी दरवाजे बंद होत आहेत. मनोज जरांगे हा ‘तुतारी’चा माणूस आहे, हे जनतेच्या लक्षात आले आहे. त्यामुळे मराठा समाजाचे लोक त्यांच्यापासून दूर होत आहेत, असे राणे म्हणाले.

उद्धव ठाकरे (Uddhav Thacekray) यांना महाविकास आघाडीमध्ये किंमत राहिलेली नाही. संजय राऊत म्हणजे त्यांचा सकाळचा भोंगा आहे. तो भोंगा काही तरी बडबड करतो. त्यामुळे त्यांच्या बोलण्याला किंमत उरलेली नाही. उद्धव ठाकरे हे महाराष्ट्रद्वेषी आहेत. उद्धव ठाकरे राज्याला लागलेली कीड आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत ही कीड काढून टाकू, अशी टीकाही नितेश राणे यांनी केली आहे.

ताफा अडविण्याचा प्रयत्न

भाजपचे नितेश राणे यांनी पोलिसांना धमकी दिली. बायकोचाही फोन येणार नाही, अशा ठिकाणी पाठवू अशा शब्दांचा त्यांनी पोलिसांसाठी वापर केला. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या पोलिस बॉईज संघटने राणे यांचा निषेध केला. अकोल्यात राणे यांचा ताफा अडविण्याचा प्रयत्न करण्यात आला. राणे यांचा ताफा जुने शहरातील राजेश्वर मंदिराकडे जात असताना निमवाडी चौकात घोषणाबाजी करीत पोलिस बाईज संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना काळे झेंडे दाखविले. या आंदोलनामुळे अकोला पोलिसांची चांगलीच धावाधाव झाली. नागपूर येथे बोलताना त्यांनी पोलिसांवर टीका केली होती.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!