महाराष्ट्र

Devendra Fadnavis : संवेदनशील लोकच माफी मागतात

Shivaji Maharaj Statue : पुतळ्याच्या मुद्द्यावरून देवेंद्र फडणवीस यांची टीका

Malvan Rajkot Issue : छत्रपती शिवाजी महाराज यांचा मालवण राजकोट येथील पुतळा कोसळला. यासंदर्भात सुरू झालेले राजकारण अद्यापही थांबलेले नाही. महाविकास आघाडीकडून अद्यापही महायुती सरकारवर टीका होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माफी मागितल्यानंतरही विरोधी पक्ष यावरून आंदोलन करीत आहे. यासर्व विरोधकांना देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात प्रत्युत्तर दिले. फडणवीस म्हणाले, जे लोक संवेदनशील असतात, तेच माफी मागतात. मुजोर लोकांकडून माफीची कोणतीही अपेक्षा करता येत नाही. 

नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर फडणवीस यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पुतळ्याच्या मुद्द्यावरून अद्यापही राजकारण करणाऱ्यांना प्रत्युत्तर दिले. पुतळा कोसळल्यानंतर काँग्रेसकडून सातत्याने सरकारवर टीका होत आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अपमानावरून भाजपने काँग्रेसवरही टीका केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संदर्भात चुकीचा इतिहास काँग्रेसने अनेक वर्ष मुलांना शिकविला. त्यामुळे 70 वर्षांत केलेल्या चुकीची माफी काँग्रेसने मागितली पाहिजे, असे फडणवीस म्हणाले.

चौकशीला सुरुवात

मालवण राजकोट येथील पुतळा कोसळल्याच्या मुद्द्याची चौकशी सुरू आहे. यासंदर्भात फौजदारी गुन्हाही नोंदविण्यात आला आहे. मात्र महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) अद्यापही सरकारच्या विरोधात आंदोलन आणि टीका सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचा माफीनामा मान्य नसल्याचे काँग्रेसचे म्हणणे आहे. आघाडीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या शिवसेनेकडूनही (Shiv Sena) सरकारला लक्ष्य करण्यात येत आहे. पुतळ्यावरून राज्यातील शिवप्रेमींना भडकाविण्याचे काम महाविकास आघाडीकडून करण्यात येत असल्याचे भाजपच्या नेत्यांचे म्हणणे आहे.

Shivaji Maharaj Statue : पुतळा उभारणाऱ्याला आपटेला अटक!

महाराजांवर राजकारण

अशातच विरोधकांना भाजप आणि शिवसेनेकडून चोख प्रत्युत्तर देण्यात येत आहे. शिवसेनेकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विरोधकांना उत्तर देत आहेत. भाजपकडून देवेंद्र फडणवीस यांनी मोर्चा सांभाळला आहे. शुक्रवारीही (ता. 6) त्यांनी नागपुरातून महाविकास आघाडीवर टीकास्त्र डागले. जे लोक मुजोर असतात ते कधीच माफी मागत नाही. त्याचे कारण म्हणजे त्यांना त्यांनी केलेल्या कृत्याचा कधीच पश्चाताप नसतो, असे फडणवीस म्हणाले. जे सुरूवातीपासून वेगवेगळ्या महापुरुषांचा अवमान करीत आले आहेत, अशांनी इतरांकडून माफीची अपेक्षा ठेवणे चुकीचे असल्याचे फडणवीस म्हणाले. त्यामुळे महाविकास आघाडीने उगाच मान-अपमानाच्या बाता मारू नये, असेही फडणवीस म्हणाले. केंद्र सरकार आणि महाराष्ट्रातील महायुतीचे सरकार आपले कर्तव्य चोखपणे बजावत आहे. त्यामुळे अनेक वर्ष ज्यांनी काहीच केले नाही, त्यांनी आता ज्ञानदान करू नये, असा सल्लाही फडणवीस यांनी दिला.

error: Content is protected !!