Post Of National President : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी चर्चेत आले आहे. महाराष्ट्राचे राजकारण सोडून दिल्लीत जाण्यास ते इच्छुक नसल्याची माहिती आहे. अशात शनिवारी (ता. 3) फडणवीस यांनी सर्व नियोजित कार्यक्रम रद्द करीत नागपुरात संघ मुख्यालय गाठले. यावेळी फडणवीस यांनी संघाच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चाही केली. अलीकडेच काही दिवसांपासून फडणवीस यांच्या नावावर चर्चा सुरू आहे. फडणवीस भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोरात सुरू आहे. या चर्चेला सुरुवात झाल्यानंतर देवेंद्र आणि अमृता फडणवीस यांनी अचानक पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची भेट घेतली. त्यानंतर अध्यक्षपदाबाबतची चर्चा अधिक वेगाने सुरू झाली.
अध्यक्षपदाच्या चर्चेला फडणवीस यांनी नागपुरात उत्तर दिले. ही चर्चा माध्यमांनी सुरू केली आहे. केवळ माध्यमांमध्येच ही चर्चा असल्याचे त्यांनी एका वाक्यात सांगितले. पत्रकारांनी काही प्रश्न विचारण्यापूर्वीच त्यांनी कॅमेऱ्यांकडे धन्यवाद म्हणत पाठ वळवली. अशात अचानक शनिवारी फडणवीस संघ मुख्यालयात दाखल झालेत. त्यामुळे त्यांना दिल्लीत जाण्यात कोणताही रस नसल्याचे सांगण्यात येत आहे. महाराष्ट्रातील नेत्यांनाही फडणवीस राज्याच्या राजकारणातच कायम राहावे, असे वाटत आहे. त्यामुळे या विषयावर फडणवीस यांनी संघाच्या नेत्यांशी चर्चा केल्याचे सांगण्यात येत आहे.
नड्डांचा उत्तराधिकारी कोण?
भाजपचे विद्यमान अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यानंतर कोण अध्यक्ष होणार हा प्रश्न लोकसभा निवडणुकीनंतर कायम आहे. अशातच फडणवीस यांच्या नावावर चर्चा सुरू झाली. संघाने देखील फडणवीस यांच्या नावाला पसंती दर्शविली आहे. त्यामुळे शिक्कामोर्तब होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. देवेंद्र फडणवीस आतापर्यंत भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाच्या कसोटीवर खरे उतरले आहेत. त्यामुळे नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्याही पसंतीला फडणवीस उतरले आहेत. त्यामुळे त्यांच्यावरील जबाबदारीत वाढ करण्याचा निर्णय भाजपच्या कार्यकारिणी कडून होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
देवेंद्र फडणवीस यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चांगले संबंध आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघही फडणवीस यांच्या नावावर सहमत आहे. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या सोबतही फडणवीस यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. त्यामुळे संघ व भाजपमध्ये फडणवीस यांच्या नावाबाबत एकवाक्यता आहे. ही एकवाक्यता असली तरी फडणवीस यांना दिल्लीत जाण्याची सध्या इच्छा नसल्याचे सांगण्यात येत आहे. यापूर्वीही फडणवीस दिल्लीत जाणार असल्याची चर्चा अनेकदा रंगली आहे. जेव्हा जेव्हा ही चर्चा रंगली त्या त्या वेळी फडणवीस यांनी अगदी ताकदीने आपण दिल्लीला जाणार नाही, असे ठामपणे सांगितले. परंतु यंदा फडणवीस यांचा तो ठामपणा कमी जाणवत आहे.