BJP : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात पूर्व विदर्भात मतदान झाले. या मतदानाची टक्केवारी वाढू शकली नाही. यासंदर्भात भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने स्थानिक नेत्यांना जाबही विचारला. हा अनुभव लक्षात घेता दुसऱ्या टप्प्यातील मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी प्रयत्न होत आहेत. शुक्रवारी (ता. 26) विदर्भात दुसऱ्या टप्प्यातील मतदान सुरू झाले. वर्धा, अमरावती, अकोला, बुलढाणा यवतमाळ-वाशिम या मतदारसंघातील मतदारांना यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भावनिक आवाहन केले.
पश्चिम विदर्भात मतदान असल्याने फडणवीस यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा फोटो वापरला. त्यांच्या अभंगाच्या ओळीची पोस्ट व्हायरल केली. या पोस्टमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि स्वतःचा वारकरी विषयातील फोटोही फडणवीस यांनी वापरला. मतदानाची टक्केवारी घटली तर नुकसान आपल्यालाच होते. राष्ट्रसंतांनीही याबाबत लिहून ठेवले आहे, असे फडणवीस यांनी या पोस्टमध्ये नमूद केले. या पोस्टच्या माध्यमातून फडणवीस यांनी भाजपच्या पारंपरिक मतदारांना घराबाहेर पडण्याचे एकप्रकारे आवाहनच केले आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ज्या ओळींचा संदर्भ दिला आहे, त्या अशा आहेत..
मत हे दुधारी तलवार |
उपयोग न केला बरोबर ||
तरि आपलाचि उलटतो वार |
आपणावरी शेवटी ||
पोस्टची गरज का भासली ?
पहिला टप्प्यातील मतदानात पूर्व विदर्भातील जिल्ह्यांचा समावेश होता. या जिल्ह्यांमध्ये भाजपच्या पारंपरिक मतदारांना घराबाहेर आणण्यात बूथ पातळीवरील नेते, कार्यकर्ते काहीसे कमी पडले. याच कारणामुळे पूर्व विदर्भात मतदानाची टक्केवारी वाढली नाही. त्यामुळे भाजपने या विषयावर तत्काळ चिंता व्यक्त केली. चिंतनही केले. त्यानुसार यापुढील सर्व टप्प्यातील मतदानात भाजपचा पारंपरिक मतदार घराबाहेर पडलाच पाहिजे, अशी आग्रही भूमिका आता नेत्यांची आहे. पश्चिम विदर्भातील जिल्ह्यांमध्ये मतदान होत असल्याने सहाजिकच फडणवीस यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या अभंगाचा आधार घेत मतदारांना आवाहन केल्याचे दिसून येते.
Lok Sabha Election : यवतमाळच्या कारागृहातून सर्वच्या सर्व मतपत्रिका परत कारण..
पश्चिम विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना मानणारा वर्ग मोठा आहे. अमरावती जिल्ह्यामध्ये तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची समाधीच आहे. राष्ट्रसंतांनी दिलेला प्रत्येक संदेश गुरुदेव भक्त शिरोधारी मानतात. त्यामुळेच फडणवीस यांनी त्यांच्या ओळींचा आधार घेत मतदारांना जास्तीत जास्त मतदान करण्याचे आवाहन केले. पश्चिम विदर्भात ज्या ठिकाणी मतदान झाले, त्या सर्व जागा महायुतीसाठी प्रतिष्ठेच्या आहेत. वर्धा, अमरावती, अकोला, बुलढाणा यवतमाळ-वाशिम या मतदार संघातील लढत अटीतटीची आहे. त्यामुळेच या भागातील आपला मतदार घरातून बाहेर पडलाच पाहिजे, असा आग्रह नेत्यांचा आहे.