Nagpur : 2019 मध्ये निवडून आलो तरिही आपलं सरकार आलं नाही. महाविकास आघाडीचं सरकार आलं. तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी झोपडपट्टी पट्टेवाटप योजना गुंडाळली होती, असा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. नागपुरात दक्षिण पश्चिम मतदारसंघात त्यांच्या हस्ते मालकीहक्काचे वाटप करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
ते म्हणाले, ‘महायुतीचं सरकार आल्यावर पुन्हा पट्टे वाटप सुरु केले. जोपर्यंत गरिबाला जमिनीचा अधिकार मिळत नाही, तोपर्यंत ते गरिब गरिबीतून बाहेर येऊ शकणार नाहीत. नागपूर रेल्वे स्टेशनच्या सातबाऱ्यावरही झुडपी जंगलाची नोंद आहे. याबाबतही आता निर्णय होणार आहे. मालकी हक्काचे पट्टे मिळाल्यावर ज्यांची घरे कच्ची असतील, त्यांना प्रधानमंत्री आवास योजनेतून पक्के घर बांधून मिळेल.’
ज्या लोकांनी 50 वर्षांत तुमच्याकडे ढुंकून बघीतलं नाही, ते लोक सांगतात पट्टे नकली आहे. या लबाड लोकांपासून सावध राहा. गरिबांना गुलामीत ठेवणं हाच काँग्रेसचा अजेंडा. काँग्रेस ने जन्मभर हेच केलं आहे. त्यामुळे या लबाडांपासून सावध राहा, असे आवाहनही त्यांनी केले.
60 वर्षे या देशात आणि राज्यात काँग्रेसचं शासन होतं. विकास कामांच्या नावावर काय केले? निवडणूक आली की पट्टे वाटपाचे आश्वासन द्यायचेच काम काँग्रेसने केले. पण आश्वासन कधीही पूर्ण केले नाही. कुणाला मालकीचा हक्क देखील मिळाला नाही, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.
मुख्यमंत्री झाल्यानंतर निर्णय
2014 साली मी मुख्यमंत्री झाल्यावर झोपडपट्टीत राहणाऱ्यांना मालकी हक्काचे पट्टे देण्याचा निर्णय घेतला. नागपूर शहरात 2014 ते 2019 या काळात 43 झोपडपट्ट्यांना मालकी हक्काचे पट्टे दिले, असे फडणवीस म्हणाले. विरोधी पक्षात असतानाही आपण यासाठी संघर्ष केला असल्याची आठवण त्यांनी करून दिली. नागपुरात जवळपास 25 हजार जणांना मालकी हक्काचे पट्टे आपल्या निर्णयामुळे देण्यात आले आहे. काँगेसच्या काळात एकालाही मालकी हक्काचे पट्टे मिळाले नाहीत, असा दावाही त्यांनी केला.
योजनेची अफवा
लाडकी बहीण योजनेची घोषणा झाली तेव्हापासूनच विरोधक आक्रमक झाले. योजना बंद होण्याची अफवा त्यांनी सुरू केली. ही योजना बंद होईल असं काँग्रेसचे लोक खोटं बोलतात. ही योजना बंद होणार नाही. पुढच्या मार्चपर्यंतचे पैसे आम्ही लाडकी बहिण योजनेसाठी बजेटमध्येच ठेवलेय. पुन्हा नव्या बजेटमध्ये निधी देऊ, असे ते म्हणाले.
यावरही विरोधकांची टीका
एसटी प्रवासात महिलांना सूट देण्यात आली. यावर सुद्धा विरोधक टीका करू लागले. परंतु ही सवलत सुद्धा अमलात आली. आणि महिलांना या सर्व गोष्टींचा लाभ होऊ लागला. महिलांना प्रवासात 50 टक्के सवलत, मुलींच्या शिक्षणाचा पैसा लागणार नाही. हे सारे भारतीय जनता पक्षाने करून दाखविले. मुलांसाठी अप्रेंटीशीप योजना आम्ही आणली. १० लाख मुलांना महिन्याला १० हजार रुपये देणार आहे. भारतीय जनता पक्षाच्या सरकारने गरिब कल्याणाचा अजेंडा राबवलाय, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.