Maharashtra Politics : महाराष्ट्रातील मंत्रिमंडळ विस्ताराबाबत दिल्लीमध्ये तोडगा निघणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे खाते वाटपावर टीकामोर्तब करणार आहेत. यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे हे बुधवारी (11 डिसेंबर) दिल्लीमध्ये दाखल झाले. त्यांच्या पाठोपाठ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील दिल्लीला पोहोचले आहे. मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीला जाण्याचे टाळले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शिंदे नाराज असल्याच्या चर्चेला ऊत आला आहे.
महायुतीच्या सरकारमध्ये एकनाथ शिंदे यांनी गृह आणि महसूल या दोन विभागांची मागणी केली आहे. त्यातील गृह विभाग देण्यास भारतीय जनता पार्टी तयार नाही. नेहमीप्रमाणे गृह विभाग देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच राहणार आहे. त्यामुळे खातेवाटपाच्या तिढ्यावर तोडगा काढण्यासाठी दिल्लीमध्ये बैठक बोलावण्यात आली होती. मात्र या बैठकीला एकनाथ शिंदे यांनी दांडी मारली आहे.
विस्ताराची प्रतीक्षा
दिल्लीमध्ये पोहोचल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रपती द्रौपदी मूर्मु यांची भेट घेतली. त्यानंतर ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही भेटले. भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची देखील फडणवीस यांनी भेट घेतली. त्यानंतर फडणवीस, पवार आणि बावनकुळे यांनी केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्यासोबत बैठकीसाठी तयारी केली. मात्र बैठकीमध्ये एकनाथ शिंदे नसल्याने गृह आणि महसूल विभागाच्या विषयावर कोणता तोडगा निघणार? याची उत्सुकता आहे.
महाराष्ट्रातील निवडणुकीनंतर 5 डिसेंबरला मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना शपथ देण्यात आली. तेव्हापासून सहा दिवस झाले तरी मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये पदांची संख्या, खातेवाटप यावर अद्यापही चर्चा सुरू आहे. काही मंत्र्यांच्या नावावर भारतीय जनता पार्टीची हरकत आहे. त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला काही नावांवर कैची मारावी लागणार आहे.
Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांचे नागपुरातील ‘लँडिंग’ लांबले
मुहूर्त केव्हा?
नागपूर मध्ये राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन 16 डिसेंबरपासून होणार आहे. त्यापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार येणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र पुन्हा एकदा महत्त्वाच्या बैठकीला एकनाथ शिंदे अनुपस्थित राहिल्याने मंत्रिमंडळातील विस्तार आणि खातेवाटपावर कोणता तोडगा निघणार? त्याची प्रतीक्षा आहे. अशा परिस्थितीमध्ये मंत्री पदाची आस लावून बसलेल्या अनेक आमदारांना ‘वेट अँड वॉच’ करण्याशिवाय कोणताही पर्याय नाही. हिवाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार न झाल्यास नागपूरमध्ये शपथविधी सोहळा घ्यावा लागणार आहे.