Vidarbha : पावसामुळे पोलीस भरतीची तारीख पुढे ढकलण्यात यावी अशी मागणी विविध राजकीय नेत्यांकडून आणि लोकप्रतिनिधी यांच्याकडून करण्यात आली. मात्र आता पोलीस भरतीला सुरुवात झाल्याने ऐन पावसाळ्यात पोलीस भरतीची प्रक्रिया होणार आहे. आजपासून वेगवेगळ्या जिल्ह्यांत एकूण 17 हजार 471 पदांसाठी पोलीस भरती प्रकियेला सुरुवात झाली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने शासनाचा निवडणुकीपूर्वी पोलीस भरती प्रक्रिया राबविण्याचा मानस यातून व्यक्त होत आहे. पण पावसात मैदानी चाचण्यांमध्ये उमेदवारांना मोठे नुकसान होण्याची शक्यता देखील व्यक्त करण्यात येत आहे. अशात भरती प्रक्रिया सुरू झाल्याने परीक्षार्थी विद्यार्थी चाचणीसाठी आपल्या केंद्रावर पोहोचले. तर मुंबईत पावसामुळे भरती प्रक्रियाचे वेळापत्रक अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. मात्र घाटकोपरच्या रेल्वे पोलीस मैदानात रेल्वेतील विविध पदांकरता भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे. दुसरीकडे अकोला, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती या जिल्ह्यांतही भरती प्रक्रियेला सुरूवात झालेली आहे.
राज्यात सध्या काही जिल्ह्यांत पाऊस सुरू आहे. अशा स्थितीत भरती प्रक्रिया राबवणे योग्य नाही, अशा भावना व्यक्त केल्या जात आहेत. तर अर्ज करणाऱ्या युवकांनी आपल्या लोकप्रतिनिधींना निवेदन देऊन पोलीस भरती प्रक्रिया पुढे ढकलण्याची मागणी केली होती. तर राजकीय नेत्यासह लोकप्रतिनिधी यांनी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पोलीस भरती प्रक्रिया पावसामुळे पुढे ढकलण्याची मागणी केली होती. मात्र अखेर आज पोलीस भरती प्रक्रियेला सुरू झाली. एकीकडे चाचणीचा ताण असताना दुसरीकडे पावसाच्या धारा यामुळे परीक्षार्थींची गैरसोय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. असे असले तर तरी अनेक जिल्ह्यांत भरती प्रक्रिया चालू झाली आहे.
BJP : देवेंद्रांचे आसन कायम! विधानसभाही त्यांच्याच नेतृत्वात
समस्येचा जोर
पोलीस भरतीत विद्यार्थ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. एकूण 5 घटकामध्ये प्रक्रिया पार पडणार असून सर्व चाचाणी घटक एकाच दिवशी येत असल्याने त्यांना प्रवासाची समस्या उद्भवण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. तसेच मैदानी चाचणी ही पावसाच्या दृष्टीने दोन महिने समोर घेण्यात यावी. मैदानी चाचणी दरम्यान एखाद्या विद्यार्थ्याला दुखापत झाल्यास इतर चार प्रवर्गातील मैदानी चाचणी विद्यार्थ्यांना देता येणार नाही. तर ग्रामसेवक व आरोग्य सेवक या परीक्षेचे देखील प्रवेशपत्र देण्यात आल्याने विद्यार्थ्यांच्या मनात संभ्रम निर्माण झाले आहे. परीक्षेला हजर राहू न शकल्यामुळे विद्यार्थ्यांचे फार मोठया प्रमाणात नुकसान होणार आहे.
अकोला, अमरावतीत भरतीला सुरुवात
अकोला आणि अमरावती जिल्ह्यात पोलीस भरती प्रक्रियेला सुरूवात झाली आहे. अकोल्यात पोलिस शिपाई पदाच्या 195 जागांसाठी भरती होणार आहे. अमरावती मध्ये 281 पदाच्या पोलीस भरतीला सुरुवात झालेली आहे. अकोल्याच्या पोलिस मुख्यालयात पहाटे 5 वाजेपासून मैदानी चाचणीला सुरुवात झाली आहे. प्रक्रिया पारदर्शक व शिस्तबद्धरित्या होत आहे. कुठल्याही विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही याची काळजी घेण्यात आली आहे. पोलीस भरती संदर्भात कुठल्याही प्रलोभनात विद्यार्थ्यांनी बळी पडू नये असे आवाहन देखील पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षक यांच्याकडून करण्यात आले आहे.
17 हजार जागांसाठी 17 लाखांवर अर्ज
राज्यात एकण 17 हजार 471 जागांसाठी 17 लाख 76 हजार 256 अर्ज आले आहेत. बँड्समन पदासाठी 41 जागा आहेत. या पदासाठी 32 हजार 26 जणांनी अर्ज केले. तुरूंग विभागातील शिपाई पदाच्या एका जागेमागे सुमारे 207 उमेदवार स्पर्धेत आहेत. या पदासाठी 1800 जागा उपलब्ध असून 3 लाख 72 हजार 354 अर्ज आले आहेत. चालक पदासाठी 1686 जागा उपलब्ध असून 1 लाख 98 हजार 300 अर्ज (एका जागेमागे 117) आले आहेत. सर्वाधिक जागा आणि सर्वाधिक अर्ज पोलीस शिपाई पदासाठी आहेत. 9595 जागांसाठी 8 लाख 22 हजार 984 अर्ज आले असून एका जागेसाठी साधारण 86 उमेदवार, असं याचं गुणोत्तर आहे. शीघ्र कृती दलातील 4 हजार 349 जागांसाठी 3 लाख 50 हजार 592 अर्ज (एका जागेसाठी 80 उमेदवार) आले आहेत. अर्जदारांमध्ये 40 टक्के उमेदवार हे उच्चशिक्षित आहेत.