Name Of Tipu Sultan : अकोल्याच्या इतिहासात कधी नव्हे ते भारतीय जनता पार्टीचा दारुण पराभव झाला आहे. या पराभवासाठी भारतीय जनता पार्टीची निवड प्रक्रिया दोषी ठरली आहे. दुसरे महत्त्वाचे म्हणजे ज्या व्यक्तीने अकोला महापालिकेच्या सभागृहाला शहीदे आजम टिपू सुलतान असे नाव दिले त्याच व्यक्तीला भारतीय जनता पार्टीने आमदारकीची उमेदवारी दिली होती. विधानसभेच्या निवडणुकीत हा मुद्दा बऱ्यापैकी गाजला. टिपू सुलतानची हीच तलवार देखील भाजपचे तुकडे करण्यासाठी एक कारण ठरली आहे. कितीही आरोप-प्रत्यारोप झाले तरी साजिद खान पठाण नावाच्या काँग्रेसच्या उमेदवाराला मोठ्या प्रमाणावर हिंदू मतदारांनी मतदान केले आहे.
निवडणुकीच्या प्रचारामध्ये सातत्याने ‘बटेंगे तो कटेंगे’ या आधारावर भावनिक साद घालण्यात आली. त्यानंतरही मोठ्या प्रमाणावर हिंदू मतदान साजिद खान पठाण यांना कसे झाले याचे आत्मपरीक्षण करण्याची गरज आता भारतीय जनता पार्टीपुढे निर्माण झाली आहे. अकोल्यामध्ये महानगरपालिका स्थापन झाल्यानंतर सभागृहाला शहीदे आजम टिपू सुलतान असे नाव देण्यात आले. पूर्वी पेरून ठेवलेले बीज आपल्यापुढेच काटेरी झाड बनवून उभे राहील याची कल्पना देखील भाजपने केली नव्हती.
आता काय करणार?
महापालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता आणि भारतीय जनता पार्टीचे महापौर असतानाही टिपू सुलतान हे नाव हटवण्यामध्ये भाजपला अपयश आले. अर्थातच या विषयाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले गेले. मतदार मूर्ख असतो. त्याला काहीही कळत नाही. तो लवकरच सगळे विसरून जातो, असा अनेकांचा गैरसमज असतो. परंतु यंदाच्या विधानसभा निवडणुकीतून मतदारांनी ‘पब्लिक सब जानती है’ हे दाखवून दिले. त्यामुळे झालेल्या चुका दुरुस्त करून आता अकोल्याचा विकास करण्याचे आव्हान भारतीय जनता पार्टीपुढे आहे.
निवडणूक आटोपली असली तरी शहीदे आजम टिपू सुलतान हे नाव अद्यापही कायम आहे. आता महाराष्ट्रामध्ये महायुतीचे सरकार आहे. महायुतीला बहुमत मिळाली आहे. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री आहेत. फडणवीस हे देखील भाजपचेच आहेत. त्यांनी ठरवलं तर एका रात्रीतून नागपूर शहरांमध्ये अनेक रस्ते करून दाखवले. त्यामुळे अकोल्यातून महापालिकेच्या सभागृहाचे नाव बदलण्यासाठी भाजप पाठपुरावा करणार का? अशी प्रतीक्षा आता नागरिकांना आहे.
NCP : राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून तटकरे परिवार सगळ्यात मोठा लाभार्थी !
निवडणुकीमध्ये विजय मिळाला तर आपण टिपू सुलतान हे नाव काढून दाखवू, असा दावा भाजपच्या नेत्यांकडून करण्यात आला होता. निवडणुकीचा निकाल काहीही लागलेला असला तरी कट्टर हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आता भारतीय जनता पार्टी टिपू सुलतानचे नाव काढण्यासाठी कुणाच्या स्वाक्षरीने मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार हे पाहण्यासारखे ठरणार आहे. प्रशासकराज सध्या महानगरपालिकेमध्ये आहे. प्रशासक हा थेट राज्य सरकारच्या नियंत्रणात असतो. राज्य सरकारने कोणताही निर्णय घेतल्यास त्याची अंमलबजावणी प्रशासकाला करावी लागते. त्यामुळे राज्य सरकारने अकोला महापालिकेच्या सभागृहाला दिलेले शहीदे आजम टिपू सुलतान हे नाव रद्द करण्याचा निर्णय घेतला तर तो बदलण्याचा अधिकार कोणालाही नाही.
कायदेशीर तरतूद व्हावी
सभागृहाचे नाव बदलल्यानंतर स्वाभाविकपणे यासंदर्भात न्यायालयामध्ये काहीजण दाद मागण्याची शक्यता आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजना आणताना जशी कायदेशीर तरतूद महायुती सरकारने पक्की करून ठेवली अगदी तशीच तरतूद हे नाव रद्द करताना महायुती सरकारला करावी लागणार आहे. त्यामुळे भाजपचा अकोल्यात ढासळलेला बुरुज पुन्हा उभा करण्यासाठी आता भाजपलाच प्रयत्न करावे लागणार आहे. विशेष म्हणजे हत्तीचे दात जसे दाखवायचे वेगळे आणि खायचे वेगळे असतात, तशा हिंदुत्वापासून भाजपमधील काही नेत्यांना स्वतःला दूर ठेवावे लागणार आहे.
Akola BJP : ज्यांना हात धरून बाहेर काढलं, त्यांना पक्षानेही डावललं
कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता हा आत्मा असतो. आत्माच निघून गेला तर केवळ मृत शरीर उरते. त्यामुळे या आत्म्याला जपण्याचे काम आता भाजपच्या नेत्यांना करावी लागणार आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे ‘तुम्ही येथे अपेक्षित नाही’ हे प्रेमळ शब्द बदलावे लागणार आहे. अतिउत्साही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना आवर घालावी लागणार आहे. चहापेक्षा केटली गरम होणार नाही, याची काळजी घ्यावी लागणार आहे. अन्यथा अकोल्यातील भाजपला ‘बटेंगे और फिटेंगे’ अशा परिस्थितीला तोंड द्यावे लागणार आहे. त्याची सुरुवात महापालिकेच्या सभागृहाचे नाव बदलण्यापासून भाजपला करावी लागणार आहे.