BJP : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मतदानाच्याच दिवशी सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांची भेट घेतल्यामुळे अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. निकालापूर्वीच सरसंघचालकांची भेट घेतल्यामुळे अनेक चर्चांना देखील उधाण आले आहे. राज्यभरातील मतदान आटोपल्यानंतर एक्झिट पोलमध्ये महायुतीच्या बाजुने कल दाखविण्यात आला. त्यानंतर ही भेट झाल्याची चर्चा आहे.
2014 मध्ये देवेंद्र फडणवीस यांचे नाव मुख्यमंत्रीपदासाठी चर्चेत होते. पण त्यांच्या नावाची घोषणा झालेली नव्हती. नाव जाहीर झाले त्याच्या आदल्या दिवशी रात्री उशीरापर्यंत फडणवीस सरसंघचालकांच्या निवासस्थानी होते. दोघांमध्ये दीर्घ चर्चा झाली आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी फडणवीस मुंबईला रवाना झाले. मुंबईत दाखल झाल्यावर थोड्याच वेळात त्यांच्या नावाची मुख्यमंत्री म्हणून घोषणा झाली, असा घटनाक्रम होता. पण त्यावेळी विधानसभा निवडणुकीचा निकाल लागलेला होता. भाजप हा सर्वांत मोठा पक्ष होता. शिवसेना वेगळी लढली होती, पण युती होणारच होती. त्यामुळे फडणविसांचे सरसंघचालकांकडे जाणे, आश्चर्याची बाब नव्हती.
आज पूर्णपणे वेगळे चित्र आहे. महायुतीमध्ये भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) असे तीन पक्ष आहेत. एक्झिट पोलने महायुतीला 150 ते 160 जागा मिळतील, असा अंदाज व्यक्त केला आहे. अर्थात त्यात भाजप मोठा भाऊ असणार, असेही म्हटले आहे. एक्झिट पोलनंतर फडणविसांनी सरसंघचालकांचे घर गाठले आहे. पण अद्याप निकाल यायचा असताना फडणवीस यांनी भागवत यांची भेट घेऊन 15 मिनिटे चर्चा केली. विशेष म्हणजे यावेळी दोघांच्या व्यतिरिक्त कुणीही नव्हते. त्यामुळे निकालानंतरच्याच विषयावर चर्चा झाली असावी, असा अंदाज व्यक्त होत आहे.
मी पुन्हा येईन?
महायुती सत्तेत आल्यास मुख्यमंत्री कोण होणार, यावर चर्चा सुरू आहे. देवेंद्र फडणवीस एकदा मुख्यमंत्री राहून चुकले आहेत. त्यानंतर शिंदे यांनी उद्धव यांची साथ सोडत भाजपसोबत सत्ता स्थापन केली. महाविकास आघाडीचे सरकार कोसळले आणि भाजप-शिंदे सत्तेत आले. भाजपने एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केले. त्यानंतर अजित पवार राष्ट्रवादी घेऊन सोबत आले. ते उपमुख्यमंत्री झाले. आता अडिच-अडिच वर्षांचा फॉर्म्युला वापरला जाण्याची शक्यता आहे. असे झाल्यास फडणविसांचे ‘मी पुन्हा येईन’ हे विधान सत्य होऊ शकते.