महाराष्ट्र

Mumbai : अजितदादांनी घेतला अधिकाऱ्यांचा क्लास!

Ajit Pawar : विकास प्रकल्प रखडण्याची विचारली कारणे

Maharashtra Development : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आढावा बैठकीत अधिकाऱ्यांचा क्लास घेतला. प्रकल्प रखडण्याची कारणे विचारतानाच नियमित कामे करून राज्याचे दीर्घकालीन नुकसान टाळण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. मंत्रालयात झालेल्या उपमुख्यमंत्र्यांच्या प्रकल्प सनियंत्रण कक्षामध्ये (प्रोजेक्ट मॉनिटरिंग युनीटच्या) त्यांनी वरीष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली.

राज्यातील विकासकामांची गती राखण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे. विलंबामुळे प्रकल्पांच्या किंमतीत भरमसाठ वाढ होते. त्यातून राज्याचे दीर्घकालीन नुकसान होते. हे नुकसान टाळण्यासाठी नियोजित वेळेत विकास प्रकल्प मार्गी लावण्यावर भर द्यावा, अशा सूचना अजित पवार यांनी दिल्या. पुणे शहरात वाहतुक कोंडीची समस्या गंभीर आहे. सर्व विभागांनी योग्य समन्वय आणि ताळमेळ राखत पुणेकरांची वाहतुक कोंडीतून सुटका करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

केंद्राकडे पाठपुरावा करा

माण-हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गिका क्रमांक तीनच्या कामाला गती द्या. हडपसर ते लोणीकाळभोर, हडपसर ते सासवड, स्वारगेट ते कात्रज, वनाज ते चांदणी चौक, रामवाडी ते वाघोली या वाढीव मेट्रो मार्गांच्या परवानगीसाठी केंद्रसरकारकडे पाठपुरावा करा, या सूचनाही त्यांनी दिल्या.

पुण्याची वाहतूक कोंडीतून सुटका करा

नागरिकांच्या दृष्टीने महत्त्वाच्या असणाऱ्या पुणे शहर आणि उपनगरांची वाहतुक कोंडी तातडीने सोडवा. त्यासाठी पुणे रिंगरोडचे काम वेगाने मार्गी लावा. त्याचबरोबर पुणे शहरातील रस्त्यावर पडलेले खड्डे तातडीने बुजविण्यात यावेत. पुणे शहरात दरवर्षी लाखो नवीन वाहने रस्त्यावर येत आहेत. त्यामुळे शहरातील वाहतुकीचा ताण दिवसेंदिवस वाढत आहे.

कामांचा वेग वाढवा

पुणे शहर आणि उपनगरातील वाहतुक सुरळीत करण्यासाठी मेट्रो, उड्डाणपूल, रिंग रोड तसेच सर्व पायाभूत सुविधांच्या कामांचा वेग वाढविण्यात यावा. यासाठी या प्रकल्पांशी संबंधित सर्व विभागाने योग्य समन्वय आणि ताळमेळ राखत पुणेकरांची वाहतुक कोंडीतून सुटका करावी, असे अजित पवारांनी म्हटले.

या कामांचाही आढावा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी सातारा येथील वैद्यकीय महाविद्यालय, सैनिक स्कुल, अलिबागच्या उसर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रेवस ते रेड्डी सागरी महामार्ग, पुणे बाह्यवळण रस्ता, वडाळा येथील जीएसटी भवन, पुणे नाशिक हायस्पीड रेल्वे, ‘सारथी’संस्थेचे पुण्यातील मुख्यालय, औंध, नाशिक, कोल्हापूर, नागपूर, अमरावतीतील ‘सारथी’च्या विभागीय उपकेंद्रांचे बांधकाम, पुणे येथील कृषीभवन, शिक्षण आयुक्तालय, कामगार कल्याण भवन, सहकार भवन, नोंदणीभवन आदी प्रकल्पांच्या प्रगतीचा देखील आढावा घेतला.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!