Sexual Assault : ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथील पीडित मुलींची ओळख जगजाहीर होईल, असे कृत्य माध्यम प्रतिनिधी किंवा नागरिकांनी करू नये, अशी सूचना विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केली आहे. बदलापूर येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पोलिसांची भेट घेतली. त्यांनी संबंधित पीडित कुटुंबांची सुद्धा भेट घेतली. एका कुटुंबातील महिलेच्या आईचा फोन डॉ. गोऱ्हे यांना आला होता. नातेवाईकांनी देखील मुलींची ओळख पटेल अशी माहिती प्रसाारित करण्यात येत असल्याची तक्रार केली.
बलात्कार पीडित कोणत्याही पीडितेची किंवा तिच्या कुटुंबाची माहिती कायद्याने उघड करता येत नाही. यासंदर्भात नाव, पत्ता, फोटोही व्हायरल करण्यात येऊ नये, असा नियम आहे. सर्वोच्च न्यायालयानेही यासंदर्भात कडक नियम केले आहेत. अशातच बदलापुरातील प्रकरण हे बाल लैंगिक अत्याचाराचे आहे. ‘पोक्सो’ कायद्यातील हे प्रकरण असल्याने या प्रकरणातील नियम आणखीच कडक आहेत. मात्र सोशल माध्यमांवर काहींनी पीडित मुलींची ओळख पटेल अशा पद्धतीने पोस्ट करण्यास सुरुवात केली आहे. असे कृत्य कोणीही करू नये, असे डॉ. नीलम गोऱ्हे यांनी नमूद केले आहे.
त्रास होऊ नये
पीडित मुलीच्या घरांचे, त्यांच्या नातेवाईकांचे पत्ते शोधून काही लोक घराजवळच घुटमळत आहेत. त्यांच्यामुळे आसपासच्या लोकांच्या मनात संशयाचे वातावरण तयार होत आहे. पीडित मुलींचे घर म्हणून लोक एकमेकांकडे पाहू लागले आहेत. त्यामुळे अनेक कुटुंबी चिंताग्रस्त आहेत. पीडित मुलींच्या कुटुंबाने तपास यंत्रणेव्यतिरिक्त कोणालाही माहिती देणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. त्यानंतरही त्यांना अशा प्रकारे त्रास होईल असे कृत्य करणे चुकीचे असल्याचे डॉ. गोऱ्हे म्हणाल्या. डॉ. गोऱ्हे यांच्या माध्यमातून पीडित कुटुंबांनी चॅनेल प्रमुख, संपादक, बदलापूर, मुंबई आणि इतर भागातले लोकप्रतिनिधींनाही असा प्रकार न करण्याचे कळकळीचे आवाहन केले आहे.
ब्लर फोटोलाही मनाई
पोस्को आणि बलात्कार विरोधी कायदा या दोन्हीमुळे पीडितांची ओळख, तिच्या घरच्यांचा परिचय, घराचे व्हिडीओ, फोटो, नातेवाईकांचा तपशिल आदी कोणत्याही माध्यमातून ओळख जगजाहीर करता येत नाही. ओळख जगजाहीर झाल्यामुळे पीडितेच्या खासगी आयुष्याला धोका होऊ शकतो. यासंदर्भात कोर्टानेही कडक आदेश दिले आहेत. प्रसंगी फौजदारी कारवाई देखील अशा प्रकरणांमध्ये करण्यात आली आहे. त्यामुळे ब्लर केलेले फोटोही व्हायरल करता येणार नाही, असे नमूद करण्यात आले आहे.
महिला अत्याचाराच्या कोणत्याही प्रकरणात पीडितेची ओळख पटेल असे कृत्य कोणीही केल्यास प्रसंगी गंभीर स्वरुपाची फौजदारी कारवाई करण्यात येईल, असा इशाराही पीडितांच्या कुटुंबीयांसह पोलिसांनी दिला आहे. त्यामुळे असे कृत्य सर्वांनी टाळावे, असे डॉ. नीलम गोऱ्हे यांनी नमूद केले आहे.