बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव शहरातून अपहरण झालेल्या १४ वर्षीय वयाच्या कृष्णाचा निर्घृण खून झाला. या घटनेने अख्खा जिल्हा हादरला आहे. आमदार संजय कुटे या घटनेमुळे उद्विग्न झाले आहेत. त्यांनी या खटल्यासाठी विशेष सरकारी वकील ॲड.उज्वल निकम यांच्या नावाचा आग्रह केला आहे. शेगाव बार असोसिएशनने देखील ॲड.उज्वल निकम यांनीच कृष्णाची बाजू लढावी, असा प्रयत्न करणार असल्याचे म्हटले होते.
कृष्णाचे अपहरण करून त्याचा मृतदेह जंगलात टाकून दिल्याची घटना 25 जुलै रोजी उघडकीस आली होती. पोलिसांनी या प्रकरणी तीन आरोपींना ताब्यात घेतले आहे. त्यांची कसून चौकशी सुरू आहे. या दुर्दैवी घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. या बालकाला गावातीलच तीन जणांनी ठार मारल्याचे उघडकीस आले आहे. पोलिसांनी या प्रकरणात नागझरी येथील तीन आरोपींना ताब्यात घेतले आहे. जळगाव जामोद विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ.संजय कुटे यांनी शेगाव पोलीस स्टेशनला भेट दिल्यांनतर घटनेचा आढावा घेतला.
शेगाव तालुक्यातील नागझरी येथील कृष्णा कऱ्हाळे या १४ वर्षीय चिमुकल्याचे अपहरण करून खून करण्यात आल्याने समाजमन हळहळले. खंडणी वसूल करण्यासाठी ही हत्या झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. आतापर्यंत २ आरोपी अटकेत आहेत. दरम्यान या घटनेवर आ. डॉ.संजय कुटे यांनी उद्विग्न प्रतिक्रिया दिली आहे. ही घटना अंत्यंत वेदनादायी आहे आहे, आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी यासाठी हा खटला जलदगती न्यायालयात चालवावा यासाठी शासनदरबारी पाठपुरावा करणार असल्याचे आ.कुटे म्हणाले.
फाशीच व्हायला हवी
माझ्या संवेदना कराळे कुटुंबासोबत आहेत. भावनाहिन झालेल्या आरोपींना फाशी व्हायला पाहिजे. यासाठी खटला जलदगती न्यायालयात चालविण्यात यावा असा माझा शासनाकडे आग्रह असणार आहे, असे आमदार कुटे म्हणाले. घटनेमागे असलेल्या पूर्ण रॅकेटचा पर्दाफाश करणे आवश्यक आहे. या प्रकरणात शासन पोलीस प्रशासन व लोकप्रतिनिधी म्हणून स्वतः विशेष लक्ष देणार असल्याचेही आ.कुटे म्हणाले.
केंद्रीय मंत्री ना.जाधवांनी गाठले नागझरी
केंद्रीय आयुष आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी आज जिल्हा नियोजन समितीची बैठक संपल्यानंतर थेट नागझरी येथे जाऊन कृष्णा कऱ्हाळे यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. सरकार आपल्या पाठीशी आहे हा विश्वास दिला. शाळकरी विद्यार्थ्यांच्या खून प्रकरणामुळे संपूर्ण जिल्हा हादरला आहे. संपूर्ण जिल्ह्याच्या संवेदना आपल्यासोबत आहेत, असा विश्वासही त्यांना दिला. आरोपींना कडक शिक्षा झाली पाहिजे त्या दृष्टिकोनातून ठाणेदार पाटील यांना निर्देशही त्यांनी दिले. यावेळी त्यांच्यासोबत मेहकरचे आमदार संजय रायमुलकर, शिवसेना जिल्हाप्रमुख शांताराम दाणे उपस्थित होते.