Political News : आपल्या व्यक्तिमत्त्वाने आणि वक्तृत्वाने सभा जिंकून मतदारांना वळविणाऱ्या स्टार नेत्यांना मतदारसंघात आणण्यासाठी सर्वच उमेदवरांची इच्छा असते. भंडारा-गोंदियामध्येही स्टार नेत्यांना बोलविण्यासाठी सर्वच प्रमुख पक्षांमध्ये चढाओढ सुरू होती. भाजपचे उमेदवार सुनील मेंढे यांच्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस धावून आले. तर काँग्रेसचे उमेदवार डॉ. प्रशांत पडोळे यांच्याकरिता काँग्रेस नेते राहुल गांधी, खासदार मुकुल वासनिक, महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सभा घेतल्या. मात्र यानंतरही भंडारा-गोंदियात कमाल साधली ती नव्या चेहऱ्यानेच.
तिहेरी लढत…
भारतीय जनता पार्टीकडून भंडारा-गोंदियाचे लोकसभेचे उमेदवार म्हणून तत्कालीन खासदार सुनील मेंढे यांचे नाव जाहिर होताच काँग्रेसकडून तगडा उमेदवार देण्याविषयी चर्चा सुरू झाल्या होत्या. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोल यांनी स्वत:च या निवडणुकीत उभे रहावे अशीही मागणी झाली. मात्र पटोले यांनी व्यवसायाने डॉक्टर असलेल्या प्रशांत पडोळे यांना संधी दिली. राजकारणातील अगदीच नवखा चेहरा दिल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या होत्या. मात्र, मतदारांनी मनात ठरवून डॉ. प्रशांत पडोळे यांना विजयी केले.
बोगस मुद्दा खूप गाजला
भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघातील निवडणूक यावेळेस अत्यंत प्रतिष्ठेची होती. उपमुख्यमंत्री फडणवीस व खासदार पटेल व भाजपा नेत्यांनी सुनील मेंढे यांच्यासाठी सभा घेऊन जिल्हा पिंजून काढला होता. दुसरीकडे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मतदारसंघात तळ ठोकून प्रचाराची धुरा खांद्यावर घेतली होती. दोन्ही पक्षांकडून दिग्गज नेत्यांच्या सभा घेण्यात आल्या आणि त्या गाजल्याही. धानाची खरेदी, बोनस, भेल प्रकल्प हे मुद्द अधिक गाजले.
या मतदारसंघातील निवडणूक ही काँग्रेसचे डॉ. प्रशांत पडोळे यांच्याविरुद्ध भाजपचे सुनील मेंढे यांच्यात झाली असली, तरी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) खासदार प्रफुल्ल पटेल यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. त्यामुळेच या मतदारसंघातील निवडणुकीकडे राज्य व देशाचे लक्ष लागले होते. या निवडणुकीत पडोळे यांच्या विजयाने पटोले यांची उंची वाढली आहे. शिवाय विदर्भात मिळालेल्या यशाने पटोले यांच्या सक्षम नेतृत्वावर शिक्कामोर्तब झाले आहे.