Vanchit vs Congress : मौलवींना शिवीगाळ व प्रकाश आंबेडकर यांच्या बाबत अपशब्द प्रकरणी काँग्रेस नेता साजिद खान पठाण यांना फरार घोषित करा अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने केली.
साजिद खान यांच्या अटकपूर्व जामिनावर आज सुनावणी झाली. त्यांना आज देखील जमानात मिळाली नाही. न्यायालयाने आता याप्रकरणी 28 मे तारीख दिली आहे. पोलिसांना आरोपी सापडत नसेल तर त्याला फरार घोषित करावे अशी मागणी वंचित बहुजन आघाडी प्रदेश प्रवक्ते राजेंद्र पातोडे यांनी केली आहे.
साजिद खान यांच्यावर या प्रकरणात गुन्हे दाखल आहेत. आरोपी हुलकावण्या देत असल्याचे पोलिस सांगत आहेत. पोलिसांना आरोपी सापडत नसेल तर मग त्याला फरार घोषित करा. ज्याच्यामुळे वाद झाले. तो काँग्रेस कार्यकर्ता देखील पोलिस शोधू शकत नाहीत, हे आश्चर्य असल्याचे पातोडे म्हणाले.
या प्रकरणी ज्या मौलाना यांना शिवीगाळ करण्यात आली त्यांनी पोलिसांना आपले बयान देखील दिले आहे. त्यामुळे शिवीगाळ करून तो मी नव्हे असा खोटा व्हिडिओ प्रसारित करण्यात आला होता, असेही पातोडे म्हणाले.
काँग्रेसचे मौन का
मौलवीना शिवीगाळ व आंबेडकर बाबत अपशब्द प्रकरणी आरोपी साजिद खान पठाण बाबत काँग्रेसचे मौन का ? असा सवाल पातोडे यांनी केला आहे. या प्रकरणात काँग्रेसचे नेते तोंडात गुळणी धरून का बसले आहे? असे वंचितनचे म्हणणे आहे. काँग्रेस नेत्यांना शिवीगाळ करून देखील त्याचे विरूद्ध कार्यवाही करण्याचे धाडस काँग्रेसला दाखवता आले नव्हते.त्यामुळे आता धर्मगुरूंना शिवीगाळ करून नेतेगिरी करण्याचा प्रयत्न साजिद पठाण याने केला होता.
मात्र वंचित सोबत नाद करायचा नाही. याचा विसर पडलेला हा नेता आव्हान देत असताना आता गुन्हे दाखल झाल्या पासून तोंड लपवून फिरत आहे. काँग्रेसचे स्थानिक नेते मात्र या प्रकरणी साधा निषेध व्यक्त करीत नाहीत, ही अत्यंत गंभीर बाब आहे. जिल्ह्यातील काँगेस नेते इतके घाबरत का आहेत ? याचे उत्तर अकोल्यातील नागरिक मागत आहेत.