Nagpur : नागपुरात स्फोटकं बनवणाऱ्या चामुंडी एक्सप्लोसिव्ह कंपनीत भीषण स्फोट झाल्याने सात जणांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेतील जखमी तरुणीचा देखील उपचारादरम्यान मृत्यू झाला. स्फोटातील मृतांची संख्या आता आठवर पोहोचली आहे.
चामुंडी एक्सप्लोसिव्ह कंपनीत झालेल्या भीषण स्फोटात सात जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये प्रांजली मोद्रे, प्राची फलके, वैशाली क्षीरसागर, मोनाली पन्नालाल बंदेवार यांचा समावेश आहे. याशिवाय चार जण गंभीर जखमी झाले. जखमींमध्ये शितल चटप, दानसा मरसकोल्हे, श्रद्धा पाटील, प्रमोद चावरे यांचा समावेश आहे. यातील श्रद्धा पाटील
वय 22 वर्ष, रा. धामणा यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. श्रद्धा पाटील यांचेवर नागपुरातील दंदे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. इतर तीन जखमींवर सेनगुप्ता हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.
चामुंडी या स्फोटकं बनवणाऱ्या कंपनीत गुरुवारी स्फोट झाला. दुपारी साधारणत: साडेबारा वाजण्याच्या सुमारास हा स्फोट झाला. हा स्फोट इतका भीषण होता की, कंपनीचं छतही संपूर्णपणे कोसळलं. या दुर्घटनेत एकूण सात जणांचा मृत्यू झाला. घटनास्थळी पोलिसांसह अग्निशमन पथक तसेच बचाव कार्य यंत्रणा सज्ज होती.
मृतकांच्या परिवाराला 35 लाख
केंद्रीय रस्ते व महामार्ग विकास मंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी चामुंडी स्फोटक कंपनी स्फोटातील मृतांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. घटनास्थळाची पाहणी केली. त्यांनी सांगितले की, मृतांच्या कुटुंबीयांना कंपनीकडून 25 लाख रुपये आणि सरकारकडून 10 लाख रुपये दिले जातील. ते म्हणाले की, दरमहा 20 हजार रुपये देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. गडकरींसोबत आमदार समीर मेघे, भाजप नेते चरणसिंग ठाकूर, पोलिस आयुक्त रवींद्र सिंगल, स्फोटक द्रव्य नियंत्रण विभागाचे अधिकारी, विद्युत निरीक्षक आदी उपस्थित होते.