Vishalgad Fort : किल्ले विशाळगड येथील अतिक्रमण काढण्याबाबत काहींनी आंदोलन केले. या आंदोलकांनी रविवारी (दि.१४) गडावरुन परत येताना मौजे गजापुर येथील मुसलमानवाडी या गावातील घरांचे व प्रार्थना स्थळाचे नुकसान केले. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घटनास्थळाला भेट दिली. तसेच पीडितांशी संवाद साधून दिलासा दिला. त्याचवेळी धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्यांना कठोर कारवाईचा इशारा दिला.
अतिक्रमणाशी संबंध नसलेल्या गावाचे नुकसान करणे चुकीचे आहे. यासंदर्भातील अहवाल जिल्हा प्रशासनाने शासनाकडे पाठविला आहे. सर्वांना तातडीची मदत शासनाकडून देण्यात आली आहे. तसेच विशाळगड अतिक्रमणाच्याबाबतीत नियमांच्या बाहेर जावून कोणावरही अन्याय केला जाणार नाही, असे उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
यावेळी मुसलमानवाडी येथे विशाळगडावरील काही नागरिक व महिला आल्या होत्या. विशाळगडावरील फक्त व्यावसायिक अतिक्रमणे काढली जात आहेत. न्यायप्रविष्ट अतिक्रमणे सोडून इतर अतिक्रमणे पावसानंतर काढली जातील असे अजित पवार यांनी या नागरिकांना सांगितले. यावेळी आमदार राजेश पाटील, जिल्हाधिकारी अमोल येडगे, पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित, उपविभागीय अधिकारी समीर शिंगटे यांच्यासह स्थानिक प्रशासनाचे अधिकारी कर्मचारी, ग्रामस्थ उपस्थित होते.
विशाळगडावरील अतिक्रमण काढण्याबाबत आंदोलकांनी मागणी केली होती. त्यावर सातत्याने प्रशासन चर्चा करत होते. त्यांना समजून सांगण्याचे काम करत होते. विशाळगडावरील अतिक्रमणे न्यायप्रविष्ट आहेत. तसेच मुंबई उच्च न्यायालयात त्याविषयी काही केसेस सुरु आहेत. न्यायालयाचा अवमान होणार नाही असा काढला जाईल असे त्यांना सांगितले होते.
याचा संबंधच नव्हता
मुसलमानवाडीत राहणाऱ्या नागरिकांचा व गडावर असणाऱ्या अतिक्रमणाचा संबंध नव्हता. आता तातडीची मदत म्हणून शासनाने त्यांना आर्थिक मदत केली आहे. नुकसानाचा अंदाज घेऊन 2 कोटी 85 लाख रुपयांचा नुकसान भरपाई प्रस्ताव तयार केला आहे, अशी माहितीही उपमुख्यमंत्र्यांनी दिली.
वातावरण दुषित करू नका
जिल्हाधिकारी तसेच पोलीस अधीक्षक दररोज याबाबत आढावा घेत आहेत. सरकारही यावर बारकाईने लक्ष ठेवून आहे. सोशल मिडीयाच्या माध्यमातून काही व्हिडीओ, आक्षेपार्ह मजकूर पोस्ट करुन सामाजिक वातावरण दुषित होईल असा प्रयत्न करु नका, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. घटनेचे संपूर्ण व्हिडीओ पोलीसांनी काढलेले आहेत. कोण दोषी आहे याची संपूर्ण शहानिशा केली जाईल आणि कठोर कारवाई केली जाईल, असा विश्वास अजित पवार यांनी दिला.