Facility For Farmer : मूल तालुक्यातील बाजार समितीच्या धान खरेदी केंद्रावर मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. शेतकऱ्यांना मुदत वाढवून दिली गेली आहे. तरीही गर्दीमुळे शेतकऱ्यांना ऑनलाइन नोंदणीसाठी अडचणी येत आहेत. अशात बेंबाळ व चिरोली गावांमध्ये दोन ऑनलाइन नोंदणी केंद्र वाढवून देण्यात यावे, अशा सूचना सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्हा पणन अधिकारी यांना दिल्या आहेत.
दोन ऑनलाइन नोंदणी केंद्र वाढविणे नितांत गरजचेचे असल्याची बाब मूलचे माजी पंचायत समिती सभापती चंदू मारगोनवार व भाजप नेते प्रवीण मोहुर्ले, त्यांच्या शिष्टमंडळांनी निदर्शनास आणून दिली होती. तातडीने दखल घेत सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्हा पणन अधिकारी ऑनलाइन नोंदणी केंद्र वाढवून देण्याच्या संदर्भात सूचना केल्या आहेत.
मिळणार सुविधा
मूल बाजार समितीला एकच नोंदणी केंद्र आहे. त्यामुळे मुल तालुक्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर या नोंदणी केंद्रावर गर्दी करीत आहेत. अशात कुणीही धान बोनसच्या नोंदणीपासून वंचित राहू नये यासाठी, सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्हा पणन अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. दोन ऑनलाइन नोंदणी केंद्रामुळे बेंबाळ व चिरोली परिसरातील नागरिकांना दिलासा मिळेल, असे मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.
धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी यापूर्वी देखील सुधीर मुनगंटीवार पुढे सरसावले होते. धानाच्या नोंदणीला सुरुवात झाल्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यातील काही भागांमध्ये इंटरनेट नेटवर्कची समस्या भेडसावत होती. त्यामुळे सुधीर मुनगंटीवार यांनी धान नोंदणीची मुदत दोनदा वाढवून घेतली होती. महाविकास आघाडी सरकारने धानाला बोनस नाकारला होता. यावेळी सुधीर मुनगंटीवार यांनीच विधानसभेमध्ये धान उत्पादक शेतकऱ्यांचा आवाज बुलंद केला होता.
Sudhir Mungantiwar : बळीराजासाठी पुन्हा सरसावले चंद्रपूरचे सुपुत्र
महायुतीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारामुळेच धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस जाहीर झाला. त्याचा लाभ आता पूर्व विदर्भातील सर्वच धान उत्पादक शेतकऱ्यांना होत आहे. यानंतर आता मूल तालुक्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पुन्हा एकदा सुधीर मुनगंटीवार पुढे आले आहेत. धानाच्या नोंदणी केंद्रांची संख्या वाढल्याने त्याचा लाभ शेतकऱ्यांना होणार आहे. तालुक्यातील अनेक गावांमध्ये शेतकऱ्यांना लांबपर्यंत जाण्याचे काम पडणार नाही. त्यामुळे दोन नवीन केंद्र सुरू करण्यासाठी मुनगंटीवार आग्रही आहेत.
यासंदर्भात अधिकारी देखील कामाला लागले आहेत. लवकरच मूल तालुक्यात दोन आणखी नोंदणी केंद्र सुरू होतील. त्यातून या तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांना सुविधा मिळणार आहे. त्यामुळे धान उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंद आणि समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.