वनमंत्री सुधीर मुनगंटीवार एका कार्यक्रमात अधिकाऱ्यांवर चांगलेच बरसले. त्यांनी फाईल रोखणाऱ्या अधिकाऱ्यांना थेट वाघाच्या पंजाचीच आठवण करून दिली. ‘हा वाघाचा जिल्हा आहे. काही अधिकाऱ्यांना फाईल रोखून ठेवण्याची सवय आहे. त्यांना लवकरच वाघाचा पंजा दाखवल्याशिवाय राहणार नाही’, या शब्दांत मुनगंटीवार यांनी अधिकाऱ्यांना दम दिला. ज्या अधिकाऱ्यांकडे त्यांचा इशारा होता, त्यांना घाम फुटेपर्यंत मुनगंटीवारांनी फटकेबाजी केली.
मोहर्ली येथे पर्यटन प्रवेशद्वार, संकूल, निसर्ग माहिती केंद्र व इतर सुविधांचे लोकार्पण त्यांच्या हस्ते झाले. यावेळी मंचावर प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा बनबल प्रमुख शोमिता विश्वास, अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक विवेक खांडेकर यांच्यासह अनेक अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. विशेष म्हणजे मुनगंटीवार यांनी आपल्या भाषणातून कोणत्या अधिकाऱ्यावर निशाणा साधला, याचीच चर्चा संपूर्ण कार्यक्रमात होती. ‘काही अधिकारी फाईल रोखून ठेवतात. त्यांना लवकरच वाघाचा पंजा बघायला मिळण्याची शक्यता आहे’ असं मुनगंटीवार म्हणाले.
‘पर्यटकांसोबत चांगलं वागा’
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प ही आपल्यासाठी परमेश्वराची देण आहे. जगभरातील लाखो पर्यटक ताडोबा व्याघ्र प्रकल्पामध्ये येतात. व्याघ्र दर्शनासाठी आलेला पर्यटक येथून चंद्रपूरचे नाव कायमचे सोबत घेऊन जातो. पर्यटकांच्या दृष्टीने ताडोबा आणि चंद्रपूरचे नाव पर्यटकांच्या आयुष्याचा ठेवा असावा. पण त्यासाठी पर्यटकांसोबत आपली वर्तणूक चांगलीच असली पाहिजे. कारण इथे येणारा प्रत्येक पर्यटक आपल्यासाठी देवासमान आहे, असं मुनगंटीवार म्हणाले.
BJP Politics : बल्लारपुरात काँग्रेसला गळती; काँग्रेसचा अध्यक्ष भाजपात!
माझ्या नावातच आहे ‘वार’
या कार्यक्रमात मुनगंटीवार यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच खडसावले. विकासकामांमध्ये अडथळा निर्माण करणाऱ्या अधिकाऱ्यांवर त्यांनी नाराजी व्यक्त केली. विशेषतः फाईल रोखून धरणाऱ्यांबद्दल त्यांनी संतप्त भावना व्यक्त केल्या. ‘माझ्यासोबत पंगा घेऊ नका. माझ्या नावातच ‘वार’ आहे. वार कसा करायचा हे मला चांगले ठावूक आहे’, असं मुनगंटीवार म्हणाले.
निसर्ग पर्यटन केंद्राला स्व. रतन टाटा यांचे नाव
प्रसिद्ध उद्योगपती स्व. रतन टाटा यांचे चंद्रपूरशी व्यावसायिक नाते नाही. तरीही त्यांचे चंद्रपूरसोबत वेगळेच ऋणानुबंध होते. रतन टाटा यांनी राज्यपालांच्या राजभवनात मोर संवर्धनासाठी निधी उपलब्ध करून दिला. तसेच त्यांनी प्राण्यांच्या रेस्क्यू सेंटरसाठी 25 कोटी दिले. सरकार आणि टाटा ट्रस्टच्या माध्यमातून चंद्रपूर येथे कॅन्सर केअर हॉस्पिटल उभे होत आहे. त्यासाठी टाटांनी 100 कोटींची देणगी दिली आहे. बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राच्या आर्किटेकसाठी टाटा यांनी 3 कोटी दिले. कृषी व्यवस्थेला चालना देण्यासाठी त्यांनी येथील 90 गावे दत्तक घेतली. त्यामुळे स्व. रतन टाटा यांचे स्मारक चंद्रपुरात करण्यात येणार आहे. तसेच निसर्ग माहिती केंद्राला स्व. रतन टाटा यांचे नाव देण्यात येईल, अशी माहिती मुनगंटीवारांनी दिली.