महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात, खेडोपाडी चांगल्या कथा, पटकथा लिहिणारे लेखक आहेत. ते कुणाला तरी आपल्या डोक्यातील कल्पना सांगतात. मग काही वर्षांनी त्याच कथेवर किंवा संकल्पनेवर आधारित चित्रपट पडद्यावर येतो. माझी कथा किंवा संकल्पना असल्याचा दावा लेखक करू शकत नाही. कारण त्याने नोंदणीच केलेली नसते. आता अशा प्रकारांना आळा बसणार आहे. कारण सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चित्रपट कथा लेखकांना खास ‘दिवाळी गिफ्ट’ दिलं आहे.
मुनगंटीवार यांच्या हस्ते ‘कलासेतू’ या पोर्टलचं बुधवारी लोकार्पण झालं. कथा किंवा पटकथा लिहिल्यावर नोंदणीची प्रक्रिया घरबसल्या करता येणार आहे. त्यामुळे कथा किंवा संकल्पना चोरण्याच्या घटनांना आळा बसणार आहे. त्यामुळेच कलासेतू पोर्टल चित्रपट कथा लेखकांच्या उज्ज्वल भविष्याची नांदी ठरणार असल्याचा विश्वास मुनगंटीवार यांनी व्यक्त केला आहे.
मराठी लेखक, दिग्दर्शक यांच्यासाठी सरकारने या माध्यमातून नवे ऑनलाइन व्यासपीठ तयार केले आहे. ‘कलासेतू’ पोर्टल विशेषतः चित्रपट कथा आणि पटकथा लेखकांसाठी आहे. त्यांच्या कथा-पटकथा-संहिता अपलोड करण्यासाठी, त्यांची नोंदणी करण्यासाठी आणि प्रदर्शित करण्यासाठी याचा उपयोग होणार आहे. अनेक लेखकांना आपल्या संहितेच्या कॉपीराईटसाठी काय करावे, हेच कळत नाही. मुंबईत जाऊन नोंदणी करण्याशिवाय पर्याय नव्हता. मात्र मुनगंटीवार यांच्या अभिनव संकल्पनेतून आता कलावंत आणि प्रशासन यांच्यात ‘सेतू’ निर्माण झाला आहे.
असा होईल फायदा
लेखक आपले काम जगातील कोणत्याही ठिकाणावरुन कोणत्याही वेळी पोर्टलवर अपलोड करू शकतील. आपली कथा-पटकथा-संहिता या पोर्टलवर सोप्या प्रक्रियेतून नोंदवू शकतात. सृजनशील लेखक आणि नविन कल्पनांच्या शोधात असणारे निर्माते यांच्यात ‘सेतू’ म्हणून हे पोर्टल काम करेल. चित्रपट उद्योगात ‘मिसिंग’ असलेली विश्वासार्हता या निमित्ताने निर्माण होईल, असे बोलले जात आहे.
‘हे तर हक्काचं माहेरघर’
हा अनोखा सेतू राज्याच्या आणि देशाच्या सांस्कृतिक नकाशाला अधिक व्यापक, आणि समृध्द करेल. भविष्यात या पोर्टलद्वारे गीतकार, संगीतकार, संकलक, वेशभूषाकार, निर्मिती प्रमुख, कला दिग्दर्शक हे सारे एका धाग्यात जोडले जातील. चित्रपट क्षेत्रातील सर्व प्रकारचे तंत्रज्ञ व कलावंतांसाठी हे व्यासपीठ हक्काचे माहेरघर बनेल, असा विश्वास सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.
रंगभूमीचाही विचार व्हावा!
सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात सांस्कृतिक कार्य विभाग वैशिष्ट्यपूर्ण निर्णयांमध्ये कायम आघाडीवर आहे. त्यांनी कलासेतूच्या माध्यमातून चित्रपट कथा-पटकथा लेखकांची सोय केली. पण, नाट्यसंहिता लिहिणाऱ्यांना मात्र आजही रंगभूमी परिनिरीक्षण मंडळाच्या किचकट प्रक्रियेला सामोरे जावे लागत आहे. नाट्यसंहिता नोंदवून सेन्सॉर बोर्डाकडून त्याचे प्रमाणपत्र घेण्यासाठी कुरियर आणि मनी ऑर्डर अशा आऊटडेटेड प्रक्रिया पार पाडाव्या लागतात. नाट्य लेखकांसाठी देखील अशाप्रकारचे पोर्टल मुनगंटीवार यांनी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी होत आहे.