बालपणी शाळेत आम्हाला शिक्षक पुस्तकातील छत्रपती शिवाजी महाराज शिकवायचे. त्यावेळी त्यांच्या अनेक प्रसंगांचं ते वर्णन करायचं. आपण वयानं लहान होतो, पण हे सर्व प्रसंग ऐकल्यानंतर प्रचंड रोमांच उभं राहायचं. शाळेत असताना कधी विचारही केला नव्हता की आपण राजकारणात जाऊ. आमदार बनू किंवा मंत्री वैगरे. पण कदाचित छत्रपती शिवाजी महाराज यांचीच ही इच्छा असावी, की चंद्रपूरच्या एका मावळ्याला सेवेची संधी द्यावी. त्यामुळं त्यांनीच अशी नियती घडवून आणली की, सांस्कृतिक मंत्री म्हणून त्यांची सेवा करण्याचं सौभाग्य प्राप्त झालं.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल भरभरून बोलताना राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री यांचा आवाज जड झाला होता. त्यांच्या स्वरातून त्यांचे शिवप्रेम दिसत होतं. एका मुलाखतीच्या निमित्ताने मुनगंटीवार यांच्या नसानसात छत्रपती शिवाजी महाराज कसे भिनले आहेत, याची प्रचिती सगळ्यांना आली. सांस्कृतिक कार्य मंत्री म्हणून छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराष्ट्राचं कुलदैवत आई तुळजा भवानीची सेवा करता आली. आपला जन्मच सार्थ झाला असं वाटतं. आयुष्यात सगळंच मिळाल्याचं आता समाधान आहे. स्वराज्याचे पोशिंदा, अख्ख्या जगाचं दैवत असलेल्या शिवाजी महाराज आणि तुळजा भवानीनं आशीर्वादाचा हात डोक्यावर ठेवल्याचाच हा अनुभव असल्यााचं मुनगंटीवार म्हणाले.
मनापासून शिवभक्ती
छत्रपती शिवाजी महाराज यांची सेवा आपण मनापासून केली. शाळेत ऐकलं होतं की महाराजांनी वाघनखांनी अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला. पण मंत्री झालो तेव्हा दिसलं की त्याच अफजल खानाच्या कबरीचं उदात्तीकरण होत होतं. स्वराज्याच्या देवतेवर चाल करून आलेल्या अफजल खानाची कबर सजविली जात होती. त्यामुळं प्रचंड अस्वस्थ झालो. महाराजांचा अपमान करणाऱ्यांचं उदात्तीकरण सहन केलं तर आपल्यासारखा पापाचा भागीदार कोणी नसेल असं वाटलं. त्यामुळेच कबरीचं अतिक्रमण हटविण्याचं धाडस केलं.
कबरीचं अतिक्रमण हटविताना कोणत्याही जातीधर्माला टार्गेट करणं हा हेतू मुळातच नव्हता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांमध्ये अनेक मुस्लिमही होते. महाराजांनी राज्य करताना कोणाची जात पाहिली नाही. फक्त न्याय आणि अन्याय याचा विचार केला. काय चूक आणि बरोबर हे पाहिलं. त्यामुळे आपणही कबरीचं अतिक्रमण हटविताना धर्म, जात, पंथ याचा विचार केला नाही. आपलं ते कर्तव्य शिवाजी महाराज यांच्या प्रती होतं ते पार पाडलं.
Sudhir Mungantiwar : हरीयाणात यश मिळाले; जम्मू काश्मिरातही भाजपची ताकद वाढली
जगभरातील शिवप्रेमी ठरवतील की सुधीर मुनंटीवार यांनी योग्य केलं की अयोग्य असंही ते म्हणाले. महाराजांनी अफजल खानाचा कोथळा बाहेर काढण्यासाठी जी वाघनखं वापरली, ती भारतात आणण्याचं यशही मिळालं. कदाचित शिवाजी महाराजांचीच ती ईच्छा असावी की चंद्रपुरातील एका साध्या शिवप्रेमीच्या हातून हे वाघनखं स्वराज्याच्या मातीत परत यावे. त्यामुळे महाराजांबद्दल आदर आणि सेवाभावातून वाघनखं परत आणण्याचं काम केल्याचंही मुनगंटीवार यांनी सांगितलं.
डोळे तरळले
आग्र्याच्या ताजमहालात शिवाजी महाराजांचा अवमान झाला होता. हे देखील वाचलं होतं. त्यामुळे महाराजांचा झालेला हा अवमान मनाला बोचत होता. लाखो सुया अंगाला टोचल्यावर जितक्या व्यथा होतात. त्यापेक्षाही ही वेदना जास्त वाटत होती. त्यामुळं त्याच आग्र्यात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्याचा निर्णय घेतला. त्याच दिवाण-ए-आममध्ये स्वराज्याचा भगवा फडकवला आहे. तेव्हा खरोखर डोळे पाणावले अशी भावना मुनगंटीवार यांनी व्यक्त केली.
श्रीशैलमला महाराजांचं मंदिर उभारण्याचं सौभाग्य मिळालं. शिवाजी महाराजांनी आई तुळजा भवानी मातेला छत्र अर्पण केले होतं. पण हे छत्र पळविण्यात आलं. आईला छत्र नव्हतं. पुन्हा मनात विचार आला, की ती तर आई आहे. शिवाजी महाराज आणि आईच्या प्रेमानं स्वस्थ बसू दिलं नाही. त्यामुळे तुळजा भवानीला छत्र अर्पण केलं. जी देवी अख्ख्या जगाला सगळं काही देते तिला आपण काय देणार. पण तिनेच आपल्या हातून हे छत्र करून घेतलं. कदाचित तिला माझ्यात मनापासून असलेलं शिवप्रेम दिसलं असावं, असे भावनिक उद्गार सुधीर मुनगंटीवार यांनी काढले.
पाकिस्तानला धडकी
महायुतीचं सरकार आल्यानंतर आता मंत्रालयात रोज तीन मिनिट छत्रपतींच्या विचारावर आधारीत अनाऊन्समेंट करण्यात येत आहे. ज्या जेएनयु विद्यापीठात ‘भारत तेरे टुकडे होगे..’ अशा घोषणा दिल्या गेल्या, त्याच विद्यापीठात आता छत्रपती शिवाजी महाराज शिकविले जाणार आहे. मंत्री म्हणून हे करून घेता आलं. यामागे कोणाला डिवचण्याच्या हेतू नव्हता. तर भावी पिढीला छत्रपती शिवाजी महाराज कळले पाहिजे. विशेषत: दिल्लीतील तरुणाईला ‘दख्खन का शेर’ कळला पाहिजे. महाराजांची राज्यनीती, उदारता, न्याय व्यवस्था, स्त्रियांचा सन्मान कळला पाहिजे हाच हेतू त्यामागे आहे.
आम्ही पुणेकर संस्थेच्या मदतीने भारत-पाकिस्तान सीमेवर छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा उभारला गेला आहे. हा पुतळा पाहून पाकिस्तानलाही धडकी भरेल असा हा पुतळा आहे. महाराजांवर डाक तिकिटही निघाले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री जिजाऊ यांच्या जन्मस्थळाचाही कायापालट होत आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाचे साडेतीनशे वर्ष होते. रायगडावर दिमाखदार सोहळा आयोजित करण्यात आला. आता सरकारी निधीतून दरवर्षी हा सोहळा साजरा होणार आहे. 75 वर्षात जे कोणालाही करता आलं नाही, ते करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला, अशी भावना सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली.