Winter Assembly Session : महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात समावेश न झाल्यामुळे भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार सुधीर मुनगंटीवार नाराज आहेत, अशी चर्चा सुरू आहे. मात्र, मुनगंटीवार यांनी विधानभवनात एन्ट्री घेत स्वतःच यावर स्पष्टीकरण दिलं आहे. ‘मी कोणत्याही परिस्थितीत नाराज राहू शकत नाही. पक्षाने विचार करूनच योग्य निर्णय घेतला असेल. काही कार्यकर्ते नक्कीच नाराज झाले आहेत. त्यांचे नाराज होणे स्वाभाविक आहे. त्यामुळे मी या कार्यकर्त्यांना सुद्धा भेटणार आहे,’ असं मुनगंटीवार यांनी स्पष्ट केलं.
चंद्रपूर जिल्ह्यातून काही कार्यकर्ते नागपूरच्या दिशेने पायी चालत निघाले आहेत. या कार्यकर्त्यांना भेटणे माझे कर्तव्य आहे. कार्यकर्त्यांना सांभाळण्याची जबाबदारी माझी आहे. ही जबाबदारी जर आपण पार पाडू शकलो नाही तर काही उपयोग नाही, असेही सुधीर मुनगंटीवार म्हणाले.
काहीच पर्मनंट नाही
१९९५ पासून मी आमदार आहे. मंत्री पद मिळाले काय किंवा नाही मिळाले काय, जनसेवेमध्ये कुठलाही अडथळा येणार नाही. मी कालही जनतेची सेवा करीत होतो. आजही जनतेच्या सेवेमध्ये कोणताही खंड पडणार नाही, अशी ग्वाही सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची मी भेट घेतली. गडकरी हे माझे मार्गदर्शक आहेत. त्यामुळे त्यांची भेट घेणं म्हणजे घरातील व्यक्तीची भेट घेण्यासारखे आहे, असंही मुनगंटीवार म्हणाले.
पक्ष ठरवेल ते योग्य
भारतीय जनता पार्टीकडून मोठी जबाबदारी मिळणार का, या प्रश्नाचे उत्तर देताना सुधीर मुनगंटीवार म्हणाले, ‘कोणती जबाबदारी मिळेल, हे अद्याप मला ठाऊक नाही. पक्षाने कोणतीही जबाबदारी दिली तरी ती स्वीकारण्यासाठी मी तयार आहे. पक्षाने मला आमदार म्हणून जबाबदारी दिली. जनसेवा करून ही जबाबदारी पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. भविष्यामध्ये पक्ष जे ठरवेल ते योग्यच असेल. दिलेली जबाबदारी पार पाडणे हे माझे कर्तव्य आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
Sudhir Mungantiwar : चंद्रपूरच्या वाघाची विधान भवनात दमदार एन्ट्री
तोच सच्चा कार्यकर्ता
पक्षाने दिलेली प्रत्येक जबाबदारी जो पार पाडतो तोच खरा कार्यकर्ता असतो. कोणत्याही परिस्थितीमध्ये पक्ष हा सर्वश्रेष्ठ असतो. कोणत्याही कार्यकर्त्याच्या बाबतीत निर्णय घेताना पक्ष फार विचारपूर्वक काम करत असतो. त्यामुळे पक्षाने माझ्यावर अन्याय केला किंवा मी दुखावलोय, असं अजिबात नाही. माझ्या चेहऱ्यावर कुठेही नाराजीचे भाव कुणाला दिसणार नाहीत. त्यामुळे मुनगंटीवार नाराज आहेत, असं म्हणणं चुकीचं ठरेल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.