Political War : कुणी एखादा लोकसभेत निवडून गेला, म्हणून तो विकासाची कामे करेल, असे अजिबात नाही. जातीपातीचे राजकारण सुरू करेल. लोकांमध्ये भ्रम पसरविण्यासाठी व्हाट्सअपवरून विषारी विचार पसरवू शकेल. साधा एक रस्ताही मतदारसंघाला देण्याची त्यांची क्षमता नाही, असे म्हणत राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काँग्रेस नेत्यांवर नाव न घेता थेट हल्ला चढवला.
चंद्रपूर जिल्ह्याच्या पोंभुर्णा येथील राजराजेश्वर सभागृहात शुक्रवारी (ता. 9) भाजपचे मंडळ संमेलन पार पडले. यावेळी मंत्री मुनगंटीवार बोलत होते. ते म्हणाले, इतर पक्षांच्या लोकांना इतरांनी इर्षा आणि हेवा करावा, असे कार्यकर्ते भाजपकडे आहेत. काँग्रेसचे लोकही व्यक्तिगत चर्चेत मान्य करतात की, विकास फक्त भाजपच करू शकतो. निवडणूक आल्यावर काही नेते या भागात कार्यक्रम करताना दिसतात. पण त्यांचं ध्येय पाच वर्ष अभ्यास करून पास होणे नाही. तर तीन महिने कॉपी करून पास होणाऱ्या विद्यार्थ्यांसारखं आहे, असा जोरदार टोला त्यांनी विरोधकांना हाणला.
मतदारसंघ आपोआप जोडला जाईल..
आधी परिवारातील लोकांना, शेजाऱ्यापाजाऱ्यांना, मित्रपरिवाराला जोडा. मग मतदारसंघ आपोआपच जोडला जाईल. आपआपसांमध्येही कधी हेवा असतो, तसे होऊ देऊ नका. हे सांगताना ‘थ्री इडीयट’ चित्रपटातील एक उदाहरण मुनगंटीवार यांनी दिले. ‘दोस्त फेल हुवा तो दुख होता है, लेकिन दोस्त पास हो जाये तो भी दुख होता है…’ हा संवाद त्यांनी कार्यकर्त्यांना ऐकवला.
कार्यकारिणी लवकरच..
आपला सहकारी पुढे गेला, तर कधी कधी दुःख होतं. हे जरी खरं असलं तरी ही भावना पक्षवाढीला पोषक नाही. त्यामुळे कमजोर लोक मग संघटनेमध्ये जातीचा उपयोग करतात. इर्षा न करता मी काय काम करू शकतो, याचा विचार करून कार्य करण्याची गरज आहे. पोभुर्णाच्या कार्यकारिणीला उशीर झाला, हे मान्य आहे. पण येत्या एका आठवड्यात आपण ती पूर्ण करणार आहो. पोंभुर्णा तालुका नेहमी भाजपला अनुकुलच राहिला आहे. या तालुक्यानं भाजपवर प्रेम केलं आहे.
पोंभुर्णा औद्योगिक विभाग होणार..
आपण येथे भरपूर कामे केली. एखाद दुसरा अपवाद असेल. सर्वच कामे पूर्ण झाले, असं मी म्हणणार नाही. कारण तसं झालं. तर निवडणुका बंद कराव्या लागतील. पण जी कामे पूर्ण केली. तेव्हा काही लोकांचे पोट दुखायला लागले. फक्त बगीचा केला असा विरोधक सोशल मीडियावरून सांगतात . पण ग्रामीण रुग्णालयही केले. ग्रामपंचायतची नगरपंचायत केली. आता थेट मुंबईला जोडणारा महामार्ग पोंभुर्ण्यातून करतोय. विकासाची शेकडो कामे केली.भविष्यात पोंभुर्णा मोठा औद्योगिक विभाग होईल, यात शंका नाही, असंही सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं.