महाराष्ट्र

Pravin Darekar : ठाकरेंना देवेंद्रद्वेषाने पछाडलेय!

Devendra Fadnavis : आमदार प्रविण दरेकरांची टीका; संजय राऊत यांच्यावरही निशाणा

Political News : देवेंद्र फडणवीस यांच्याशिवाय संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंना राज्यात दुसरे काहीही दिसत नाही. दोघांनाही देवेंद्रद्वेषाने पछाडले आहे, अशी टीका भाजपा गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी केली.

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी आमदार दरेकर आले होते. त्यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. संजय राऊत यांनी केलेल्या विधानावर दरेकर म्हणाले की, ‘देवेंद्र फडणवीस यांच्याशिवाय त्यांना राज्यात दुसरे काही दिसत नाही. राज्यातील प्रश्न, विकासावर ते बोलत नाही. देवेंद्रद्वेषाने संजय राऊत, उद्धव ठाकरे पछाडलेले आहेत. त्यांना त्याचा राणाभीमदेवी थाट वाटत असेल परंतु जनतेच्या मनातून उद्धव ठाकरे, संजय राऊत उतरले आहेत. फडणवीसांवर व्यक्तिगत टीका करून ते आपल्या द्वेषाच्या मानसिकतेचे दर्शन घडवत आहेत, ही वस्तुस्थिती आहे.’

दळभद्री विचाराचा नेता असला की त्याला सारंकाही तसंच दिसत असतं. संजय राऊत दळभद्री विचाराचे झालेत. ते रोज सकाळी गरळ ओकताना दिसतात, असा टोलाही दरेकरांनी राऊत यांना लगावला.

दरेकर पुढे म्हणाले, ‘भुंकणारा कुत्रा कधी चावत नाही ही आपल्यात म्हण आहे. देवेंद्र फडणवीस विरोधी पक्ष नेते होते तेव्हाही त्यांनी तेच केले. मविआला सरकारमधून बाहेर काढले आणि पुन्हा फडणवीसांनी सरकार बनवले. तरीही दोघांनी गरळ ओकणे थांबवले नाही. देवेंद्र फडणवीस कालही होते, आजही आहेत आणि उद्याही राहणार. उद्धव ठाकरेंना आपले अस्तित्व शोधावे लागेल. त्यांना जो गर्व आलाय तो महाराष्ट्रातील जनता निश्चितच उतरवेल.’

Akola : मनसेच्या आणखी पाच कार्यकर्त्यांना अटक!

उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले?

मुंबईतील रंगशारदा सभागृहात बुधवारी (दि.३१ जुलै) ठाकरे गटाचा मेळावा आयोजित करण्यात आला. या मेळाव्यात संवाद साधताना त्यांनी फडणवीस यांना आव्हान दिले. ‘आदित्यला तुरुंगात टाकण्यासाठी फडणवीस कशाप्रकारे डाव खेळत होते, हे मला अनिल देशमुख यांनी सांगितले. आता एक तर तू राहशील नाहीतर मी राहील’ या शब्दांत त्यांनी फडणवीस यांच्यावर टीका केली होती. जोपर्यंत आपण सरळ असतो, तोपर्यंत सरळ असतो. एकदा वाकड्यात घुसलो की आपण वाकडं करतो. भाजप म्हणजे चोर कंपनी आहे, ही राजकारणातील षंढ माणसं आहेत, असेही उद्धव ठाकरे म्हणाले होते.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!