Political war : पंडित नेहरु, इंदिरा गांधी, राजीव गांधींपासून काँग्रेसची भूमिका कायम आरक्षण विरोधी राहिली आहे. तोच फुत्कार पुन्हा राहुल गांधींच्या माध्यमातून समोर आला आहे, असा घणाघात भाजपचे गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी केला आहे. राहुल गांधींच्या या वक्तव्यामुळे संतापाची प्रचंड लाट उसळली असल्याचेही दरेकरांनी म्हटले आहे.
मुक आंदोलन
राहुल गांधी यांनी आरक्षणविरोधी केलेल्या वक्तव्याविरोधात चेंबूर रेल्वे स्थानकाजवळ मूक आंदोलन केले. प्रविण दरेकर यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष सिद्धार्थ कांबळे यांच्या उपस्थितीत महायुतीच्या वतीने मूक आंदोलन करण्यात आले. यावेळी तोंडाला काळ्या पट्ट्या बांधून महायुतीच्या वतीने राहुल गांधी आणि महाविकास आघाडीचा निषेध करण्यात आला. याप्रसंगी ‘नेहरू असो वा राहुल गांधी काँग्रेसला आरक्षणाचे वावडे का?’, ‘काँग्रेस आरक्षणविरोधी संविधान विरोधी’, ‘मतांसाठी काँग्रेसचे जनतेला साकडे’, ‘आरक्षणाशी यांचे कायमच वाकडे’, अशा आशयाचे फलकही झळकविण्यात आले.
पळून लावा त्यांना
यावेळी दरेकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संविधान हे आमचे दैवत आहे. या देशातील पीडित, शोषित, वंचित, उपेक्षित समाजाला आरक्षण दिले आहे. असे असताना राहुल गांधी यांनी आरक्षण रद्द करू अशी भुमिका घेणे म्हणजे ते आरक्षणविरोधी असल्याचे त्यांनी पुन्हा एकदा सिद्ध केले. आम्ही काँग्रेस, राहुल गांधींचा धिक्कार करतो. जिथे जिथे राहुल गांधी जातील तिथे आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या जनतेने राहुल गांधींना पळवून लावले पाहिजे, असे आवाहनही दरेकर यांनी केले.
दरेकर पुढे म्हणाले, ‘राहुल गांधी यांना या देशात संविधानावर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. केवळ लोकसभेला संविधान हातात घेऊन चालत नाही. आरक्षणाबद्दल यांची भूमिका अशी असेल तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवरील यांचे प्रेमही पुतना मावशीचे होते असे सिद्ध होते. याची सव्याज परतफेड महाराष्ट्रातील, देशातील जनता करेल.’
थोरात यांचे दोन
बाळासाहेब थोरात यांच्या ट्विटवर बोलताना दरेकर म्हणाले कि, ‘बाळासाहेब थोरात जर ऐकू शकत असतील तर त्यांना आम्ही क्लिप पाठवून देण्याची व्यवस्था करतो. त्या क्लिपमध्ये राहुल गांधी स्पष्टपणे आरक्षण रद्द करू असे बोलले आहेत. आता त्या ठिकाणी सोंग घेतलेल्यांना ऐकायलाही येणार नाही आणि दिसणारही नाही. बाळासाहेब थोरात यांचे ढोंग, सोंग आहे. त्यांना जनता सगळीकडून पळवून लावेल.’