Making Of New History : विदर्भ.. नैसर्गिक साधनसंपत्तीने नटलेला प्रदेश. विदर्भात सगळेच काही आहे. मुलबक खनीजसाठा, वनसंपदा, जलस्रोत, निसर्गसौंदर्य. परंतु विदर्भाकडे सुरुवातीपासूनच दुर्लक्ष करण्यात आलं. आजपर्यंतच्या राज्यकर्त्यांनी निधी देताना विदर्भाच्या बाबतीत नेहमीच हात आखडता घेतला. परंतु राज्यात सत्तापरिवर्तन झाल्यानंतर विकास काय असतो, हे विदर्भाच्या जनतेला खऱ्या अर्थाने दिसू लागले. कोणत्याही राज्याची तिजोरी म्हणजे कुबेराचा खजिनाच. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) मुख्यमंत्री झाल्यानंतर कुबेराच्या या खजिन्याच्या ‘पासवर्ड’ हाती आला तो तत्कालीन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे. त्यानंतर त्यांनी हा ‘पासवर्ड’ असा काही पाठ करू टाकला की, विदर्भात निधीचा ओघ थांबलाच नाही.
विकासाची गंगा मंत्रालयातून वाहण्यास सुरुवात झाली. चंद्रपूरचा तर मुनगंटीवारांनी कायापालटच करून टाकला. बस स्टॅन्ड, रेल्वे स्टेशन आदींना तर अगदी ‘फाइव्हस्टार लूक’ मिळाला. विदर्भाच्या विकासासाठी सरकारने योजना तयारी करत जावी आणि मुनगंटीवारांनी तिजोरी उघडून पैसे देत जावे, असा क्रमच सुरू झाला. अतिशयोक्ती नाही पण नागपूरसह विदर्भात सद्य:स्थितीत मेट्रो, रस्ते, जलसंपदा, जलसिंचन, वीज आणि मूलभूत सुविधांचा जो विकास झाला, त्यात अर्थमंत्री म्हणून मुनगंटीवार यांचा सिंहाचा वाटा राहिला आहे. कारण अर्थमंत्री म्हणून या सगळ्या खर्चाचा ताळमेळ त्यांनीच बसवला आहे. निराधारांना मिळणारे अर्थसहाय्य वाढीपासून वेगवेगळ्या योजनांसाठी त्यांनी भरभरून निधी दिला. अगदी राज्याला स्वातंत्र्यप्राप्तीनंतर पहिले तोट्याचे नव्हे तर ‘सरप्लस बजेट’ देणारे ते पहिले अर्थमंत्री ठरले. हे सगळे ‘रेकॉर्ड’वरच आहे.
आणखी एक पाऊल..
असाच एक मोठा निर्णय आता सुधीर मुनगंटीवार यांनी विदर्भाच्या बाबतीत घेतला आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री म्हणून काम करत असताना. विदर्भाच्या मातीत आल्यानंतर कवी कालिदास यांना रामगिरीच्या पर्वतावर आसमंतात आभाळ दाटलेले दिसले. यातून कालिदासांनी मेघदूत या अजरामर काव्यकृतीची रचना केली. रामगिरीच्या ज्या मातीतून हे महाकाव्य रचले गेले, आता त्याच भूमीचा कायापालट होणार आहे, तो मुनगंटीवार यांच्या एका निर्णयामुळे.
बॉलीवूड म्हटले की, सगळ्यांना डोळ्यापुढे दिसते ती स्वप्ननगरी मुंबापुरी अर्थात मुंबई. देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक येथे ‘बॉलीवूड स्टार’ बनण्यासाठी येतात. अनेक चित्रपटांचे चित्रीकरण येथे होत असते. त्याला कारणही तसेच आहे. मुंबई सर्व सुविधा असलेली सुसज्ज अशी चित्रनगरी आहे. अशीच चित्रनगरी विदर्भात का होऊ शकत नाही, हा विचार सांस्कृतिक कार्य मंत्री मुनगंटीवार यांच्या मनात आला. मग काय झालं ना.. की, ‘आले मुनगंटीवारांच्या मना, तेथे अधिकाऱ्यांचे काही चालेना’, असेच म्हणावे लागेल.
आता लवकरच या चित्रनगरीचे काम सुरू होणार आहे. या चित्रनगरीच्या उभारणीसाठी त्यांनी जागाही अशीच निवडली आहे, जिथे जगातील कलेशी संबधित अजरामर काव्यकृती रचली गेली. काव्य ही देखील एक कलाच आणि याच कलेशी संबंधित नवी चित्रनगरी साकारणार आहे ती नागपूरला लागून असलेल्या रामटेकमध्ये. चित्रनगरीच्या या निर्णयामुळे विदर्भातील कलाक्षेत्राचा मोठा कायापालटच होऊ शकतो, असे मानले जात आहे.
Sudhir Mungantiwar : 75 नवीन चित्रनाट्यगृहं; निःशुल्क चित्रीकरण!
कलेला नवसंजीवनी..
सांस्कृतिक बाबतीत बोलायचे झाले तर विदर्भात कलेबाबत वैविध्यता आहे. झाडीबोली, वऱ्हाडी अशा भाषांचा संगम विदर्भात आहे. याच बोलीभाषांवर आधारित नाट्य, काव्य, नृत्य, जीवन या भागात आहे. आदिवासींच्या एका आगळ्यावेगळ्या संस्कृतीचा लहेजा विदर्भात आहे. गडचिरोली, गोंदिया, भंडारा, मेळघाट, जळगाव जामोद या भागांत ही संस्कृती दिसते. धबधबे, जलप्रवाह, जंगल, जमिन, डोंगरदऱ्या असे सगळेच काही आहे. परंतु चित्रीकरणासाठी आतापर्यंत विदर्भातील कलावंत, निर्मात्यांना धावावे लागत होते ते मुंबईकडेच. कारण विदर्भात त्याची सोयच नव्हती. चित्रनगरीच नाही म्हटल्यावर चित्रीकरण, प्रकाश योजना, ध्वनी योजना, एडिटिंग आदी पूरक व्यवस्थाही विदर्भात तयार झाली नाही. या कामांसाठी लागणारे स्टुडिओ आदींची संख्याही बोटावर मोजण्या इतकीच. पण मुनगंटीवार यांच्या एका निर्णयामुळे आता भविष्यात हे सगळे चित्र बदलू शकते.
पूर्वीचे आंध्र प्रदेश आणि आताच्या तेलंगणात असलेल्या हैदराबादमध्ये रामोजी फिल्म सिटी आहे. जगातील भव्य फिल्म सिटींपैकी ही चित्रनगरी आहे. अगदी हुबेहुब नव्हे पण तशाच तोडीची चित्रनगरी विदर्भात होऊ शकते, अशा आशा आता कलाकारांमध्ये पुन्हा एकदा पल्लवित झाल्या आहेत. सद्य:स्थितीत रामटेकमधील चित्रनगरीसाठी 127 एकरची जागा मिळणार आहे. कालांतराचे या चित्रनगरीचा विस्तार वाढू शकतो, यात दुमत नाही. नव्याने साकार होत असलेल्या या चित्रनगरीमुळे विदर्भातील कलावंतांना हक्काचे व्यासपीठ मिळेल. पण चित्रीकरणाशी संबंधित उद्योग व्यवसायही वाढीस लागतील. त्याअनुषंगाचे अभ्यासक्रमही येतील. चित्रनगरीमुळे पर्यटनालाही चालना मिळेल. त्यामुळे प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगारही वाढेल. विदर्भातील अर्थव्यवस्थेला नवा ‘बूस्ट’ मिळेल.
Sudhir Mungantiwar : मुनगंटीवारांनी राजभवनात दिली भेट, अन् राज्यपाल पोंभूर्ण्यात येणार थेट
खरच ‘मुमकिन’ आहे..
नागपूर भारताचे हृदयस्थान आहे. रस्ता, रेल्वे, विमान अशा सर्व प्रकारच्या दळणवळणाच्या मार्गांनी नागपूर देशासह जगाशीही जोडलेले आहे. त्यामुळे चित्रनगरीच्या उभारणीतून मेघदूत साकारलेल्या रामगिरीच्या परिसरात वास्तविकतेत स्वर्ग अवतरू शकतो. कदाचित विदर्भाप्रती असलेल्या याच प्रेमातून सांस्कृतिक मंत्री म्हणून सुधीर मुनगंटीवार यांनी हा निर्णय घेतला असावा, असे बोलले जात आहे. असं झाल्यास..
तस्या: पातुं सुरगज इव व्याम्नि पशर्धलम्बी |
त्वं चेदच्छस्फटिकविशदं तर्कयेस्तिर्यगम्भ: ||
संसर्पन्त्या सपदि भवत: स्रोतसिच्छायसाsसौ |
स्यादस्थनोपगतयमुनासंगमेवाभिरामा ||
अशा पद्धतीने कवी कालिदासांनी मेघदुतात वर्णन केल्याप्रमाणे रामगिरीची भूमी स्वर्गाप्रमाणे सुंदर होणार आहे. तिजोरीचा ‘पासवर्ड’ पाठ असलेल्या नेत्यासाठी तर हे काहीच अवघड नाही, असं म्हटलं तरी ते संयुक्तीक ठरेल.