Akola News : सोशल मीडियावरून फसवणुकीच्या अनेक घटना दररोजच कानावर येतात. सोशल मीडियावर बनावट अकाऊंट उघडून सर्वसामान्यांना पैशांनी लुटण्याचे प्रकार तर नित्याचेच झाले आहेत. मात्र, सायबर चोरांनी चक्क अकोल्याचे जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्या फोटोचा वापर करून फसविण्याचा प्रयत्न केल्याची बाब समोर आली आहे. दरम्यान ज्या व्यक्तीला फसविण्यात येत होते त्याला संशय आल्याने त्याने तक्रार केल्याने अनर्थ टळला.
जिल्हाधिका-यांचे नाव व छायाचित्र वापरून व्हाट्स ॲपवरील बनावट अकाऊंटद्वारे परिचित व नागरिकांकडे पैश्याची मागणी होत असल्याचे निदर्शनास आले आहे.
हा प्रकार +856 2098392740, तसेच +91 93329 39128 या भ्रमणध्वनी क्रमांकांहून घडत आहे. अशा मेसेजवर कुणीही विश्वास ठेवू नये व अशा अकाऊंटहून संदेश येताच तत्काळ ‘रिपोर्ट’ करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी कुंभार यांनी केले आहे.
अकोल्यातील आधार केंद्रचालक योगेश भाटी यांना जिल्हाधिकारी कुंभार यांच्या नावे असा मेसेज प्राप्त झाला. तो बनावट असल्याचे लक्षात येताच त्यांनी याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना अवगत केले. जिल्हाधिकाऱ्यांनी दखल घेऊन सायबर सेलला कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. अशा प्रकारचे कुठलेही संदेश प्राप्त झाल्यास कुणीही बळी पडू नये. अशा गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी तत्काळ कारवाई व नागरिकांना सतर्कतेबाबत भरीव जनजागृती करावी, असे आदेश सायबर सेलला देण्यात आले आहेत.
पैसे मागणी करण्यात आलेल्या लोकांनी लगेच हा प्रकार लक्षात आल्याने अनेकांची संभाव्य फसवणूक टळली आहे. सोशल मीडिया हा दुधारी तलवारीसारखा आहे. त्याचे जेव्हढे फायदे आहेत, तेव्हढेच त्याचे तोटेही अशा घटना लक्षात आणून देतात. त्यामुळे सोशल मीडिया वापरतांना तुम्ही चौकस असणं असंच आवश्यक आहे. त्यामुळे तुमच्या ओळखीच्या व्यक्ती किंवा मित्रानं असे ऑनलाईन पैसे मागितले तर आधी शाहनिशा करा. नाही तर क्षणार्धात तुम्ही लुटले जाल हा धोका लक्षात आणून देण्यात आला आहे.