Maharashtra Politics : मुंबईतील उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाच्या निकालाचा वाद अद्यापही सुरूच आहे. ईव्हीएम अनलॉक करणारा मोबाईल हा रवींद्र वायकर यांच्या मेव्हण्याच्या हाती असल्याची धक्कादायक माहिती पोलिस तपासात समोर आली. त्यानंतर एकच खळबळ उडाली. विरोधी पक्षातील नेत्यांनी ईव्हीएमच्या वापरावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यामुळे, अमोल कीर्तीकर विरुद्ध रवींद्र वायकर यांच्यातील लढत पुन्हा एकदा चर्चेत आली.
आता या प्रकरणात निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण दिलं आहे. ईव्हीएम हे स्वतंत्र डिव्हाईस असून त्याला कुठलीही मोबाईल कनेक्टीव्हीटी नसल्याचं निवडणूक निर्णय अधिकारी वंदना सूर्यवंशी यांनी स्पष्ट केलं आहे. लोकसभा निवडणूक जरी संपली असली तरी वाद मात्र कायम आहे. मुंबईतील उत्तर पश्चिम मुतदारसंघात निवडणुकीत ईव्हीएमध्ये घोळ झाल्याचा आरोप विरोधी पक्षातील काही नेत्यांनी केला आहे. तसेच, अमोल कीर्तीकर यांच्याकडून यासंदर्भात अर्ज दाखल करण्यात आला आहे.
दोन दिवसांपूर्वी या प्रकरणात रवींद्र वायकर यांच्या मेव्हण्याची एंट्री झाल्याने आणखी गोंधळ उडाला. दरम्यान या प्रकरणात वनराई पोलिसांकडून निवडणूक मतमोजणी प्रक्रियेतील डेटा ऑफरेटरकडून तपास सुरु आहे. त्यामुळे या प्रकरणाला वेगळं वळण मिळालं. तर, आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या आहेत. त्यातच, ट्विटरचे प्रमुख आणि टेस्ला कंपनीचे मालक एलन मस्क यांनीही ट्विट करुन ईव्हीएमवर प्रश्न उपस्थित केला. त्यामुळे, राजकीय नेत्यांनी पुन्हा एकदा उत्तर-पश्चिम मतदारसंघातील विजयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. त्यानंतर, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली.
निवडणुक आयोगाने दिले हे स्पष्टीकरण..
डेटा कम्पॅलेशन सिस्टीम आणि ईव्हीएम वेगवेगळं आहे. ईव्हीएमशी डेटा कम्पॅलेशन सिस्टीमद्वारे केवळ वेबसाईटवर डेटा टाकला जातो. त्याच्याशी संबंधित काही ओटीपी मोबाईलवर येतो, त्यासाठी काही मोबाईल होते. त्ंयापैकीच एक म्हणजे डेटा ऑपरेटर गुरव यांच्याकडेही मोबाईल होता, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी वंदना सूर्यवंशी यांनी दिली.
ईव्हीएम हॅक होऊ शकत नाही, त्याला कुठलीही वायर किंवा वायरलेस कनेक्टीव्हीटी नसते. ईव्हीएम प्रोग्रामेबल नसून ईव्हीएमचा ओटीपी नसतो, ते स्वतंत्र आहे, असेही निवडणूक निर्णय अधिकारी वंदना सूर्यवंशी यांनी सांगितले. मोबाईल असणं हा वेगळा भाग आहे, मोबाईलचा ईव्हीएमशी कुठलाही संबंध नसल्याचेही सूर्यवंशी यांनी स्पष्ट केले.
नेमकं काय आहे प्रकरण ?
गोरेगाव नेस्को मतमोजणी केंद्रावर 4 जूनला रवींद्र वायकर आणि अमोल कीर्तिकर हे दोघेही उपस्थित होते. पोलिसांच्या तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, वायव्य मुंबई लोकसभा मतदारसंघात ईव्हीएम यंत्रातील मतांची मोजणी झाल्यानंतर इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पाठवलेल्या पोस्टल बॅलेटची मोजणी करण्यात आली. ही पोस्टल बॅलेट सिस्टीम अनलॉक करण्यासाठी दिनेश गुरव याने ज्या मोबाईलवर ओटीपी पाठवला होता, तोच फोन मंगेश पंडीलकरच्या हातात होता.
ईव्हीएम यंत्रांतील मतांची मोजणी सुरु असताना अमोल कीर्तिकर आघाडीवर होते, त्यांच्याकडे जवळपास 2000 इतके मताधिक्य होते. मात्र, इलेक्ट्रॉनिक बॅलेट सिस्टीममधील मतांची मोजणी सुरु झाल्यावर रवींद्र वायकर आघाडीवर गेले आणि कीर्तिकर यांचा अवघ्या 48 मतांनी पराभव झाला. यासंदर्भात वनराई पोलिसांनी वायकर यांचे मेहुणे मंगेश पंडीलकर आणि निवडणूक आयोगाचा एनकोर ऑपरेटर दिनेश गुरव यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आता, पोलिस तपासात पंडीलकर ईव्हीएम यंत्राशी जोडलेला मोबाइल फोन वापरत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.