प्रशासन

IPS Rashmi Shukla : अकोल्यातून सुरू झाली होती कारकीर्द

Maharashtra Police : महिला अधिकारी सर्वोच्च पदावर, पण वादाचे वलय

Assembly Election : महाराष्ट्राच्या पहिल्या महिला पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या नावामागे असलेले वादाचे वलय कायम आहे. शुक्ला यांना हटविण्याची मागणी काँग्रेसकडून करण्यात आली आहे. शुक्ला या वादग्रस्त असल्याचा आरोप काँग्रेसचा आहे. सुरुवातीपासून रश्मी शुक्ला या चर्चेत राहिल्या आहेत. त्यांची कारकीर्द विदर्भातील अकोला येथुन सुरू झाली. रश्मी शुक्ला 1988 मधील तुकडीच्या भारतीय पोलिस सेवेतील (IPS) अधिकारी आहेत. थेट सहाय्यक पोलिस अधीक्षक (ASP) म्हणून त्यांना नियुक्ती मिळाली. 

अकोला शहराला प्रथमच एक महिला पोलिस

जून 1964 मध्ये जन्मलेल्या रश्मी शुक्ला यांचे पूर्वाश्रमीचे नाव रश्मी अवस्थी आहे. अकोल्यात त्यांना सहाय्यक पोलिस अधीक्षक म्हणून नेमणूक मिळाली होती. अकोला शहर विभागात त्या एएसपी होत्या. अकोला येथील शहर कोतवाली पोलिस ठाण्याच्या वरच्या माळ्यावर त्यावेळी त्यांचे कार्यालय होते. तेव्हाच्या काळात अकोला शहराला प्रथमच एक महिला पोलिस अधिकारी मिळाली होती. रश्मी अवस्थी यांची अकोल्यातील कारकीर्द चांगलीच गाजली. विवाहानंतर त्यांचे नाव रश्मी शुक्ला असे झाले. पोलिस दलात बढती होत गेल्यानंतर कालांतराने त्यांच्या नावामागे वादाचे प्रसंग तयार झालेत.

टॅपिंगचे प्रकरण

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना रश्मी शुक्ला यांचे नाव वादात सापडले. त्यावेळी त्या राज्य गुप्तवार्ता विभागाच्या (State Intelligence Department) अतिरिक्त पोलिस महासंचालक होत्या. फोन टॅप करण्यात आल्याच्या प्रकरणावरून शुक्ला या चर्चेत आल्या. विरोधी पक्षातील नेत्यांचे फोन टॅप करण्यात आल्याचा आरोप त्यावेळी झाला. शुक्ला यांनी कोणतेही नियम न पाळता फोन टॅपिंग केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला. त्यामुळे महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारच्या काळात त्यांना आरोपी करण्यात आले होते. त्यांच्या विरोधात गुन्हा नोंदवून एफआयआर दाखल करण्यात आला.

पुणे (Pune) आणि दक्षिण मुंबईतील कुलाबा येथे शुक्ला यांच्या विरोधात दोन एफआयआर दाखल करण्यात आले होते. कारवाई झाल्यानंतर रश्मी शुक्ला यांनी धावाधाव केली. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने सप्टेंबर 2023 मध्ये शुक्ला यांच्याविरुद्ध नोंदवलेल्या दोन एफआयआर रद्द केल्या. पुण्यात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे फोन कॉल रेकॉर्ड केल्याचे हे प्रकरण होते. मुंबईत शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांचेही फोनही टॅप करण्यात आल्याचा आरोप होता. त्यानंतर रश्मी शुक्ला या महाराष्ट्रातून केंद्र सरकारच्या सेवेत प्रतिनियुक्तीवर गेल्या होत्या.

Police Inspector : पोलिसांवर गोटमार करणे भोवले

नाना पटोले यांची मागणी 

महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर त्या पुन्हा राज्यात परतल्या. त्यानंतर त्या राज्याच्या पहिल्या महिला पोलिस महासंचालक झाल्या. त्यांचा कार्यकाळ जून 2024 पर्यंत होता. मात्र विधानसभा निवडणूक जवळ आल्याने आता काँग्रेसने विशेषत: नाना पटोले यांनी रश्मी शुक्ला यांना पदावरून दूर करण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे केली आहे. शुक्ला या पदावर राहिल्यास निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप करू शकतात, असा काँग्रेसचा आरोप आहे. यावर निवडणूक आयोगाचा निर्णय काय होणार, याची प्रतीक्षा आहे. नियमाप्रमाणे निवडणूक प्रक्रियेवर परिणाम होईल, अशा अधिकाऱ्यांची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी बदली करण्यात येत असते.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!