विकास काय असतो, कामे कशी खेचून आणतात आणि त्यातून आपल्या जिल्ह्याचा उत्कर्ष कसा साधता येतो, याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्यव्यवसाय मंत्री, महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार, असे म्हणत काँग्रेसच्या शेकडो कार्यकर्त्यांनी आज (ता. 16) भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.
भाजपचे चंद्रपूर महानगर अध्यक्ष राहुल पावडे यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या भाजप प्रवेशासाठी पुढाकार घेतला आणि सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत काँग्रेस कार्यकर्ते भाजपमध्ये आले. या कार्यकर्त्यांमुळे भाजपला अधिक बळकटी मिळाली तर काँग्रेस अधिकच खिळखिळी झाली. लोकसभा निवडणूक लागल्यानंतर उमेदवारी घोषित होताच काँग्रेसचे नेते, कार्यकर्ते भाजपमध्ये दाखल होऊ लागले.
गडचिरोली जिल्ह्यातील काँग्रेसचे माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी, चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष प्रकाश देवतळे, पोंभूर्णा तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व बाजार समितीचे सभापती रवींद्र मरपल्लीवार यांच्यासह कित्येक जणांनी भाजपची वाट धरली. काँग्रेसमधील गटबाजी सर्वश्रुत आहे. त्या गटबाजीला कंटाळूनच नेते, कार्यकर्ते एक-एक करत भाजपमध्ये आले. काही कार्यकर्त्यांनी तर प्रचार करताना अडचणी येतात म्हणून काँग्रेस सोडले. कारण प्रचार करताना लोकांना सांगायचे काय? कोणती कामे केली, हे सांगण्यासाठी नसल्याने त्यांनी काँग्रेस सोडली.
आज भाजपमध्ये प्रवेश केलेल्यांमध्ये कॉंग्रेस अल्पसंख्याक आघाडी चंद्रपूर जिल्ह्याचे माजी अध्यक्ष अॅड. शाकीर मलीक, कॉंग्रेस वाहतूक सेलचे माजी जिल्हा अध्यक्ष इरफान शेख, वहाब काजी, पंकज तिवारी, आदिल खान, सरताज शेख, बिल्गू तिवारी, अक्षय भालेराव, रवी नायर यांचा प्रामुख्याने समावेश आहे. या मंडळींसह त्यांचे कार्यकर्तेदेखील भाजपमध्ये दाखल झाले आहेत. भाजयुमो महाराष्ट्र प्रदेशचे सचिव इम्रान खान, चंद्रपूर महानगर युवा मोर्चा उपाध्यक्ष चांद शेख, साजीद अली व रेणुका घोडेस्वार यांनी त्यांचे भाजपचा दुपट्टा देऊन पक्षात स्वागत केले.
चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवाराकडे सांगण्यासाठी काही कामेच नसल्याने त्यांची मोठी फजिती होताना दिसत आहे. त्यामुळेच काँग्रेसचे कार्यकर्तेही संभ्रमात सापडले आहेत. अशा परिस्थितीत सुधीर मुनगंटीवार प्रचारात विकास कामांची यादी, त्याचे डिजिटल पुरावे सादर करत आहेत. त्यामुळे विरोधकांची मोठी गोची झाली आहे. प्रचार करताना लोकांना सांगायचे काय, हा मोठा प्रश्न आहे. लोक थेटच प्रश्न करतात की, गेल्या पाच वर्षांत तुम्ही काय केले, त्यामुळे काँग्रेसच्या उमेदवाराची अडचण झाल्याचे दिसत आहे.