महाराष्ट्र

Lok Sabha Result : विदर्भात मविआ सत्ते पे ‘सत्ता’; महायुती ईन मिन फक्त तीन 

Vidarbha News : दोन जागांनी राखली भाजपची लाज 

Political War : सातत्याने भाजपला साथ देणाऱ्या विदर्भाने यांना काँग्रेसला हात दिला आहे. मतदारांची नाराजी काही प्रमाणात भाजपला भोवली आहे. त्यामुळे विदर्भातील 10 पैकी केवळ दोनच जागांवर भाजपला यश मिळवता आले आहे. याउलट काँग्रेसने पुन्हा एकदा मुसंडी मारत विदर्भात पाच जागा काबीज केल्या आहेत. ‘शुअर शॉट सीट’ म्हणून सुरुवातीपासूनच चर्चेत असलेल्या नागपुरात नितीन गडकरी यांचा अपेक्षेनुसार विजय झाला. हा मतदारसंघ वगळता भाजपला केवळ अकोला मतदारसंघात कसेबसे यश मिळवता आले आहे.

अकोल्यात वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर निवडणूक रिंगणात होते. त्यामुळे येथे मतांचे विभाजन झाले. अन्यथा भाजपला अकोल्यात विजय मिळवणं देखील अवघड झालं असतं. ही वस्तुस्थिती आता भाजपलाही मान्य करावी लागणार आहे. समीकरण काहीही असले तरी विजय शेवटी विजय असतो. तो कोणत्याही मार्गाने मिळवलेला असला तरी महत्त्वाचा असतो. असे असले तरी काँग्रेसने या विजयामुळे हुरळू नये आणि भाजपने खचू नये अशी परिस्थिती आहे.

सात आणि तीन 

विदर्भामध्ये काँग्रेसने पाच जागा मिळविल्या आहेत. महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाची बेरीज केल्यास या जागांची संख्या सात होते. भाजपला केवळ दोनच जागांवर समाधान मानावे लागले आहे. बुलढाण्यातील प्रतापराव जाधव यांचा विजय गृहीत धरल्यास महायुतीला तीन जागा मिळाल्या आहेत. विदर्भात यंदा झालेली पीछेहाट भाजपसाठी चिंता आणि चिंतनाचा विषय आहे. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्व विदर्भात झाले. या संपूर्ण भागात मतदानाची टक्केवारी अत्यंत कमी होती. मतदानाच्या टक्केवारीबाबत भाजप गाफिल राहिली. मोदी है तो मुमकिन है असे म्हटल्याने मतदार घराबाहेर पडेल असा अनेकांचा गैरसमज होता. याच गैरसमजल्यामुळे टक्केवारी घटली.

पुन्हा धावपळ 

पश्चिम विदर्भात मतदान झाले त्यावेळी देखील भाजपने हाच गाफिलपणा काही प्रमाणात दाखवला. परंतु अखेरच्या क्षणी केलेल्या धावपळीमुळे येथे मतदानाची टक्केवारी पूर्वच्या तुलनेत बरी ठरली. नागपुरात नितीन गडकरी यांनी केलेल्या विकासाला तोड नाही. त्यामुळे त्यांचा विजय पक्का होता. अकोल्यात भाजपने मतांच्या विभाजनाचे गणित लावून ठेवले होते. यवतमाळ आणि रामटेकमध्ये मतदारांच्या नाराजीचा फटका महायुतीला सहन करावा लागला. शिवसेनेच्या खासदार भावना गवळी या संपूर्ण टर्ममध्ये यवतमाळमधून गायब होत्या. त्याचा राग मतदारांनी एक प्रकारे राजश्री पाटील यांच्यावर काढला. नरेंद्र मोदी यांच्या सभांचाही येथे उपयोग झाला नाही.

Prakash Ambedkar : महाराष्ट्राचा जनादेश मी नम्रपणे स्वीकारतो

काँग्रेसने केले ओव्हरटेक 

भंडारा-गोंदियात भाजपमधील गटबाजी काँग्रेसचे डॉ. प्रशांत पडोळे यांना सहाय्यक ठरली. येथे मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपला साथ दिल्याचे फारसे दिसत नाही. रामटेकमध्येही नाट्यमय घडामोडी झाल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येथे व्यक्तिशः येऊन गेले. पण फायदा झाला नाही. काँग्रेसचे श्यामकुमार बर्वे विजयी झाले. अमरावतीमध्ये सगळ्यांच्या नाकावर टिच्चून नवनीत राणा यांना जवळ करणे भाजपला चांगलेच भोवले.

महायुतीमधील सर्वच पक्षांना नवनीत राणा नको होत्या. ही वस्तुस्थिती ठाऊक असतानाही भाजपने राणा यांना जवळ केले. त्यामुळे अमरावतीची जागा काँग्रेसचे बळवंत वानखेडे यांना मिळाली. वर्धा लोकसभा मतदारसंघातही मतदारांनी रामदास तडस यांना नाकारले. येथेही भाजपमध्ये गटबाजी होती. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाला येथे विजय मिळविला. गडचिरोली चिमूरमध्ये काँग्रेसचे नामदेव किरसान यांचे यश काँग्रेसचा खरा ‘विजय’ आहे.

चंद्रपुरातही सर्व शस्त्रास्त्रांचा वापर करीत काँग्रेसने प्रतिभा धानोरकर यांना विजयी केले आहे. त्यामुळे भाजपला आता आपली पुढील वाटचाल ठरवावी लागणार आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!