Introspection of defeat : चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा येथे काँग्रेसच्या जनसंपर्क कार्यालयात नुकतीच बैठक पार पडली. माजी आमदार सुभाष धोटे यांच्या अध्यक्षतेखाली पराभवावर चिंतन करण्यात आले. बैठकीत विधानसभा निवडणुकीतील पराभवाचे आत्मपरीक्षण नेत्यांनी केले. पक्षसंघटनेच्या मजबुतीसाठी पुढील दिशा ठरविण्यात आली. सुभाष धोटे यांच्यासह सर्वांनीच पराभवाचे खापर ईव्हीएमवर फोडले.
सुभाष धोटे म्हणाले, “क्षेत्रातील सर्वसामान्य जनता आजही काँग्रेससोबत भक्कमपणे उभी आहे. मात्र, इव्हीएम गडबड, प्रशासकीय यंत्रणेचा गैरवापर, आणि पैशाच्या प्रभावाने विरोधकांनी विजय मिळविला असल्याची भावना जनतेत आहे. त्यामुळे यापुढे संघटनात्मक बांधणी मजबूत करून शेतकरी, कष्टकरी, बेरोजगार, महिला, शिक्षण, आरोग्य आणि अन्य ज्वलंत प्रश्नांसाठी काँग्रेसचा संघर्ष सुरूच राहील.”
सुभाष धोटे यांनी पक्ष संघटनेच्या कार्यकर्त्यांचे आभार मानले. “महाविकास आघाडीतील घटक पक्ष आणि सर्वसामान्य जनतेचा पाठिंबा कायम असल्याने भविष्यात आणखी जोमाने काम केले जाईल,” असे त्यांनी ठामपणे सांगितले. महिला तालुकाध्यक्ष निर्मला कुडमेथे, नंदकिशोर वाढई, नानाजी आदे आणि कुंदा जेनेकर यांनी महिला, युवा आणि शेतकऱ्यांना काँग्रेसशी अधिक जोडण्याची गरज असल्याचे सांगून संघटनेला नव्याने उभारी देण्याचा विश्वास व्यक्त केला.
कार्यकर्त्यांचे आत्मपरीक्षण आणि निर्धार..
माजी नगराध्यक्ष अरुण धोटे यांनी निवडणुकीतील परिस्थितीचे विश्लेषण करून, “पुढील काळात अधिक जोरकसपणे जनतेसाठी काम करणे महत्त्वाचे आहे,” असे मत व्यक्त केले. तालुकाध्यक्ष रंजन लांडे यांनी, “कार्यकर्त्यांनी खूप प्रयत्न केले, परंतु अपेक्षित यश मिळाले नाही. यापुढे अधिक सक्षम पद्धतीने वाटचाल करण्याची गरज आहे,” असे नमूद केले.
पदाधिकाऱ्यांची भावना..
चिंतन बैठकीत सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पक्षसंघटना मजबूत करण्याचा निर्धार व्यक्त केला. उपस्थितांमध्ये माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, तालुकाध्यक्ष रंजन लांडे, महिला तालुकाध्यक्ष निर्मला कुडमेथे, सभापती विकास देवाळकर, दिनकर कर्नेवार, श्यामराव कोटनाके, जंगु येडमे, कुंदा जेनेकर, अँड. चंद्रशेखर चांदेकर, मंगेश गुरूनुले यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते.
एल्गार कायम ठेवण्याचा संकल्प..
माजी आमदार सुभाष धोटे यांनी, “क्षेत्रातील प्रश्नांवर आवाज उठविणे, शेतकरी व कष्टकऱ्यांच्या हक्कांसाठी संघर्ष करणे, आणि पक्षसंघटनेची बांधणी मजबुतीने करणे हे आगामी उद्दिष्ट राहील,” असे सांगून कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा भरली. बैठक संपल्यानंतर उपस्थितांनी एकत्रितपणे पक्ष संघटनेला अधिक मजबूत करण्यासाठी आपल्या कर्तव्याचा नवा संकल्प केला.