Nana Patole Statement : काँग्रेसचे बँक खाते गोठविल्यामुळे लोकसभा निवडणूक लढवायलाही पक्षाजवळ पैसाच नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. देशभरात झालेली ही आर्थिक नाकाबंदी लक्षात घेता आता काँग्रेसने मतदारांकडून उमेदवारांच्या खर्चासाठी 50 ते 100 रुपये प्रत्येकी मागण्याचा निर्णय घेतला आहे. काही दिवसांपूर्वी राहुल गांधी यांच्या उपस्थितीत नागपुरात काँग्रेसचा स्थापना दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमातील खुर्च्यांवरही काँग्रेसने देणगी गोळा करण्यासाठी ‘क्युआर कोड’ लावला होता. आता प्रत्येक मतदारसंघातील उमेदवाराच्या बँक खात्याचा तपशिल जाहीर करण्यात येणार आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी हे स्पष्ट केले.
ऐन निवडणुकीच्या वेळी भाजपा सरकारने काँग्रेसचे बँकखाते गोठविले आहे. परंतु आम्ही घाबरणार नाही. आम्ही राज्यातील उमेदवारांच्या बँकेचा तपशिल जाहीर करणार आहोत. आता आता जनतेनेच काँग्रेसच्या उमेदवाराला यथाशक्ती आर्थिक मदत करावी असे पटोले यांनी सांगितले. भाजप लोकशाही संपवण्यासाठी अत्यंत खालच्या पातळीवर आली आहे. लोकशाही वाचवणे ही सर्वांची जवाबदारी आहे. आमची लढाई लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी आहे. घराणेशाही शब्द वापरून भाजप भ्रम निर्माण करीत आहे. पण मग अमित शाह यांचा मुलगा क्रिकेट बोर्डवर आहे, देवेंद्र फडणवीस यांचे वडील आमदार होते, पंकजा मुंडे यांचे वडील गोपीनाथ मुंडे उपमुख्यमंत्री होते. यालाही घराणेशाही म्हणायचे काय? असा सवाल पटोले यांनी केले.