.लोकसभा असो वा विधानसभा, रामटेक मतदारसंघ कायम हॉट टॉपिक राहिलेला आहे. विशेषतः विधानसभेत कधीही एका पक्षाचे वर्चस्व तीन टर्मपेक्षा जास्त काळ राहिलेले नाही. त्यातल्या त्यात 11 पैकी 6 वेळा काँग्रेस आणि शिवसेनेचा आमदार राहिलेला आहे. त्यामुळेच महाविकास आघाडीत काँग्रेस आणि शिवसेना आमने सामने उभे ठाकले आहेत. पंरतु, दोघांचाही उमेदवार कोण असेल, याबाबत अद्याप अनिश्चितता आहे.
रामटेकमधून आशीष जयस्वाल महायुतीचे उमेदवार असतील म्हणून खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषित केले. त्यानंतर भाजपचे मल्लिकार्जून रेड्डी यांनी बंडाची भाषा केली. जयस्वाल अपक्ष लढले, युती धर्म पाळला नाही आणि तरीही त्यांना उमेदवारी का दिली, असा सवाल त्यांनी केला. त्यांनी फडणवीस आणि बावनकुळे यांच्यासोबत थेट पंगा घेतला. त्यामुळे महायुतीमध्ये तर वाद आहेतच. मात्र, महाविकास आघाडीचा वाद थेट दिल्लीपर्यंत पोहोचला आहे.
लोकसभा आणि विधानसभेत अनेक वर्षे रामटेकची जागा शिवसेनेनेच लढवली आहे. त्यामुळे या जागेवर आमचाच उमेदवार असेल असा हट्ट ठाकरे गटाने धरला आहे. तर शिवसेनेच्या विरोधात कायम काँग्रेसच लढले आहेत. त्यामुळे रामटेकमध्ये काँग्रेसचाच उमेदवार असेल, असा दावा महाराष्ट्रातील नेते करत आहेत. अशात शिवसेना किंवा काँग्रेस यांच्यापैकी कुणाकडेही ही जागा गेली तरीही उमेदवार कोण असतील, याबाबत अनिश्चितता कायम आहे.
शिवसेनेकडून (ठाकरे गट) माजी खासदार प्रकाश जाधव यांनी जोरदार तयारी केली आहे. रामटेक विधानसभा मतदारसंघातून 1990 मध्ये जाधव लढले होते. पण त्यांना यश मिळू शकले नव्हते. त्यानंतर 2007 मध्ये सुबोध मोहिते यांना शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि पोटनिवडणूक झाली. यात प्रकाश जाधव शिवसेनेचे उमेदवार होते. ते विजयी झाले आणि दिड वर्षांचा कार्यकाळ त्यांना मिळाला. दरम्यान जिल्ह्यातील राजकारणात ते सक्रीय झाले. शिवसेनेने त्यांच्यावर जिल्ह्याची जबाबदारी देखील सोपवली होती.
रामटेकची जागा शिवसेनेला मिळाल्यास प्रकाश जाधव उमेदवार असतील, असे बोलले जाते. मात्र त्याचवेळी विशाल बरबटे देखील सेनेकडून लढण्यास इच्छुक आहेत. जयस्वाल यांच्या विरोधात प्रकाश जाधव उभे झाले, तर रंगतदार सामना होईल, हे निश्चित आहे.
काँग्रेसला रामटेक मिळाले तर?
रामटेकची जागा काँग्रेसला देण्यात आली तर राजेंद्र मुळक इच्छुकांच्या यादीत आघाडीवर आहेत. पण, सुनील केदार यांच्या ‘यादीत’ ते आहेत का, हा मुख्य प्रश्न आहे. अशात नवीन राजकीय समीकरण रामटेकमध्ये बघायला मिळण्याची शक्यता आहे. हे नवे समीकरण तयार करण्यात सुनील केदार महत्त्वाची भूमिका निभावतील, हे निश्चित आहे.
प्रकाश जाधव विरुद्ध राजेंद्र मुळक?
रामटेकसाठी महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस आणि शिवसेनेत जोरदार रस्सीखेच सुरू आहे. शिवसेनेकडून प्रकाश जाधव आणि काँग्रेसकडून राजेंद्र मुळक दोघेही तयारीत आहेत. आपल्यालाच उमेदवारी मिळेल, असा विश्वास दोघांनाही आहे. प्रकाश जाधव यांनी तर रामटेकचा मतदार बाळासाहेबांच्या शिवसेनेच्याच विचारांचा आहे, असा दावा केला आहे. तर मुळक यांनी गेल्या काही वर्षांपासून आपला मुक्काम रामटेकमध्ये हलवला आहे.