Chandrapur Constituency : लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा महाराष्ट्रातील पाच मतदारसंघात येत्या 19 एप्रिल रोजी पार पडणार आहे. एकेकाळी कॉंग्रेसचा गड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चंद्रपूर मतदारसंघात मात्र काँग्रेसचा सध्या खेळखंडोबा सुरू आहे.
चंद्रपूरमध्ये 2019 च्या निवडणुकीत एका उमेदवाराच्या विजयावर समाधान मानावे लागले होते त्याच चंद्रपूरमध्ये आज २०२४ मध्ये कॉंग्रेसला एकही सक्षम उमेदवार मिळेनासा झाला आहे. देशात प्रचंड मोदी लाट असतानाही 2019 मध्ये बाळू धानोरकर यांच्या रुपाने एकमेव खासदार निवडून आणणाऱ्या काँग्रेसला त्याच मतदारसंघात आता उमेदवार सापडू नये, याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेसने विदर्भातील पाच पैकी चार मतदारसंघांतील उमेदवारांची नावे शनिवारी रात्री जाहीर करण्यात आली. मात्र यात चंद्रपूरचा समावेश नव्हता.
काँग्रेसने जाहीर केलेल्या यादीत नागपूर, रामटेक, भंडारा-गोंदिया व गडचिरोली या मतदारसंघांचा समावेश आहे. पाचवा मतदारसंघ असलेल्या चंद्रपूरच्या उमेदवारीचा तिढा मात्र अजुनही कॉंग्रेसला सोडविता आलेला नाही की तो सोडवायची इच्छा नाही, अशी चर्चा आता सुरू झाली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले (Nana Patole) यांना पक्षाने भंडाऱ्यामधून लढण्याचा आग्रह केला होता. मात्र त्यांनी नकार दिला आहे. अशातच आता अंतर्गत कलहामुळे कॉंग्रेसला चंद्रपूरमध्ये अतिशय लज्जास्पद परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. हाच चंद्रपूर मतदारसंघ एकेकाळी कॉंग्रेसचा गड मानला जायचा.
काँग्रेसचा पंजा छाटत 2004, 2009 आणि 2014 मधील निवडणुकांमध्ये भाजपाने सलग तीनदा ही जागा जिंकून ‘हॅट्ट्रिक’ साधली होती. 2019 मध्ये बाळू धानोरकर यांनी सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. चंद्रपूर लोकसभा निवडणुकीत ही जागा कॉंग्रेसकडे आली. त्यावेळी कॉंग्रेसला विदर्भातील ही एकमेव जागा जिंकता आली होती. कॉंग्रेसचे उमेदवार सुरेश (बाळू) धानोरकर यांनी भाजपाचे नेते हंसराज अहीर यांचा पराभव केला होता. अशातच मे 2023 मध्ये धानोरकर यांचे निधन झाले. त्यामुळे ही जागा रिक्त होती. आता लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपने या मतदारसंघातून वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना संधी दिली आहे. मुनगंटीवार यांचा जोरदार प्रचार सध्या मतदारसंघात सुरू आहे. अशातच काँग्रेसचा उमेदवारच ठरत नसल्याने नाव निश्चित होणार केव्हा, उमेदवार अर्ज दाखल करणार केव्हा आणि प्रचाराला त्याला वेळ मिळणार केव्हा असा प्रश्न उपस्थित होत आहे.