Bhandara : महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या गाडीला भंडारा शहरालगतच्या भिलेवाडा गावाजवळ काल (9 एप्रिल) रात्री अपघात झाला. या अपघातानंतर नाना पटोले यांनी ‘द लोकहीत’ला पहिली प्रतिक्रिया दिली आहे. आपल्या गाडीला जाणून बुजून ट्रकने धडक दिल्याचे नाना पटोले यांनी सांगितले आहे. त्यामुळे हा राजकीय घातपात असल्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे नाना म्हणाले.
भंडारा पोलिसात तक्रार दिल्याचे नाना पटोले यांनी सांगितले आहे. दरम्यान जनतेच्या आशीर्वादामुळे आपण सुखरूप बचावल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे या अपघाताची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी नाना पटोले यांनी केली आहे. नाना पटोले यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. प्रशांत पडोळे यांची निवडणूक अंगावर घेतली आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवाराला जिंकून आणण्यासाठी नाना पूर्ण ताकद लावत असल्याचे पाहायला मिळत आहे.
कालचा प्रचार दौरा आटपून रात्रीच्या सुमारास नाना पटोले स्वगावी जायला निघाले होते. दरम्यान भिलेवाडा गावाजवळ त्यांच्या ताफ्याला मागून भरधाव वेगाने येणाऱ्या अनियंत्रित ट्रकने जबर धडक दिली. धडक इतकी भीषण होते की नाना पटोले यांच्या गाडीच्या मागचा भाग अक्षरशः चक्काचूर झाला. मात्र आधुनिक तंत्रज्ञानाने युक्त अतिसुरक्षित गाडी असल्यामुळे नानांना व गाडीतील कुणालाही दुखापत झालेली नाही. या अपघातानंतर नाना पटोलेंनी याची माहिती भंडारा पोलिसांना दिली असून भंडारा पोलिसांनी पुढील कारवाई सुरू केलेली आहे.
राजकीय घातपात?
दरम्यान या अपघातानंतर काँग्रेसचे कार्यकर्ते संतापले आहे. काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी तर हा नाना पटोले यांच्यासोबत झालेला हा अपघात, अपघात नसून घातपात असल्याची शक्यता असल्याचा आरोप केलेला आहे. नाना आपल्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी भंडारा-गोंदिया दोन्ही जिल्हे पिंजून काढत आहेत. यामुळे विरोधकांना याची धडकी भरली असून त्यातून घडलेला हा प्रकार असल्याचाही अतुल लोंढे यांचा आरोप आहे. दरम्यान या घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी अतुल लोंढे यांनी केली आहे.