Mahavikas Aghadi : विधानसभेच्या अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीनंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी भाषण करताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. राहुल नार्वेकर उत्तम काम करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. निवडणुकीत 208 मतं मिळाल्यावरुन शिंदे यांनी पटोले यांची खिल्ली उडवली होती. त्यावरुन पटोले यांनी शिंदेंवर टीका केली. नवनिर्वाचित विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना मी मनापासून शुभेच्छा देतो. तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जो अभिनंदनाचा प्रस्ताव ठेवला त्याला मी पाठिंबा देतो, असं पटोले म्हणाले.
भारताच्या लोकसभेचे पहिले अध्यक्ष महाराष्ट्रातील सभागृहातून गेले होते. आपली मागच्या अडीच वर्षांतली कारकीर्द उत्तम होती. सभागृहातील दोन्ही बाजूचे सन्मानीय सदस्य हे आपल्या भागांचे प्रश्न घेऊन सभागृहात येतात. सगळ्यांना आपले प्रश्न, जनतेचे प्रश्न मांडण्याचा अधिकार आहे. आपण कामकाज करताना मागच्या अडीच वर्षांत सगळ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला त्यात तुम्ही ९९ टक्के यशस्वी ठरल्याचं पटोले म्हणाले.
सर्वांना हवा न्याय
विधानसभा अध्यक्ष पद, ती जागा म्हणजे काटेरी मुकुट आहे. विधानसभा अध्यक्षांच्या खुर्चीचा एक वेगळा मान आहे. आरोप, प्रत्यारोप करण्याचा अधिकार कुणालाही नाही. आपल्याकडे जी परंपरा आहे त्या परंपरेला ताकदीने पुढे न्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो, असं पटोले नार्वेकरांबाबत म्हणाले. भंडारा जिल्ह्यातील साकोली मतदारसंघातून आपण निवडणूक जिंकलो. आपण 208 मतांनी निवडून आलो. त्याबद्दलची एक टिंगल या ठिकाणी करण्यात आली. त्यामुळं एक नंबरचा उपमुख्यमंत्री आणि क्रमांक दोनचा उपमुख्यमंत्री असे नंबर द्यावे लागतील असं पटोले म्हणाले. हा उल्लेख करीत त्यांनी शिंदे यांच्यावर टीका केली.
आपली खिल्ली उडवली गेली. विधानसभेत विजयी झालेला माणूसच बसू शकतो. तो किती मतांनी निवडून आला याला महत्व नसते. आपण विदर्भात उच्चांकी मताधिक्याने निवडून आलो होतो. देवेंद्र फडणवीस यांनाही सर्वाधिक मताधिक्य मिळालं होतं. उच्चांकी मतांनी निवडून आलो म्हणजे बक्षीस मिळतं असं नाही, असंही पटोले म्हणाले. पटोले यांनी यावेही ईव्हीएमवरही टीका केली. 76 लाख मतं कशी वाढली हे निवडणूक आयोगाला विचारलं आहे. त्याचा अर्थ वेगळा घेण्याचं काही कारण नाही. बहुमत मिळालं म्हणून गर्व करण्याचा काही प्रश्न येत नाही असं नाना पटोले म्हणाले आहे.